सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 23 मे रोजी मतमोजणी होत आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार कार्यवाही करत, 44 सांगली लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. त्यासाठी दि. 22 मे रोजी दुपारी 2 वाजता सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशन, जिल्हा क्रीडा संकुलच्या मागे, मिरज येथे मतमोजणी प्रक्रियेची रंगीत तालिम घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा 44 सांगली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिली.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मतमोजणीचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून तसेच, शिस्त, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच, साधारणतः मतमोजणी आणि पोलीस बंदोबस्तासाठी जवळपास 2 ते अडीच हजार मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, दि. 23 मे रोजी सकाळी ठीक 7 वाजता स्ट्राँग रूम उघडण्यात येईल. टपाली मतमोजणी ठीक 8 वाजता सुरू होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी सुरू केली जाईल. तसेच, ईव्हीएम मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय यादृच्छिकरीत्या निवडलेल्या (रँडमली सिलेक्टेड) 5 व्हीव्हीपॅटची मतमोजणी होणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, ईव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 20 टेबलची मांडणी करण्यात आली आहे. त्यासाठी 592 मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक व सूक्ष्म निरीक्षक असणार आहेत. तसेच, प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी 5 पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.
281 मिरज विधानसभा मतदारसंघात 326 मतदान केंद्रे असून, मतमोजणीच्या 17 फेऱ्या होणार आहेत. 282 सांगली विधानसभा मतदारसंघात 310 मतदान केंद्रे असून, मतमोजणीच्या 16 फेऱ्या होणार आहेत. 285 पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघात 284 मतदान केंद्रे असून, मतमोजणीच्या 15 फेऱ्या होणार आहेत. 286 खानापूर विटा विधानसभा मतदारसंघात 348 मतदान केंद्रे असून, मतमोजणीच्या सर्वाधिक 18 फेऱ्या होणार आहेत. 287 तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात 297 मतदान केंद्रे असून, मतमोजणीच्या 15 फेऱ्या होणार आहेत. 288 जत विधानसभा मतदारसंघात 283 मतदान केंद्रे असून, मतमोजणीच्या 15 फेऱ्या होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यात सैनिक मतपत्रिका 3 हजार 870 आणि टपाली मतपत्रिका 9 हजार 208 असे एकूण टपाली मतदान 13 हजार 78 आहे. 23 मे रोजी सकाळी 7.59 मिनिटांपर्यंत आलेल्या टपाली मतपत्रिका स्वीकारल्या जाणार आहेत. इटीपीबीएस (सैनिक मतपत्रिका) स्कॅनिंग 14- सी या गोदामात करण्यात येणार आहे. त्यासाठी 20 टेबलची मांडणी करण्यात आली आहे. तर 60 मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक टेबलवर एक राजपत्रित अधिकारी व एका संगणक चालकाची नियुक्ती आणि अशा प्रत्येक 10 टेबलसाठी पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून तहसिलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सर्व पथकांसाठी एका नियंत्रण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, टपाली मतमोजणीसाठी आठ टेबलची मांडणी करण्यात आली आहे. तर 35 मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलसाठी पर्यवेक्षक म्हणून वर्ग 1 चे राजपत्रित अधिकारी व सहाय्यक म्हणून 1 नायब तहसिलदार व इतर विभागातील वर्ग 2 च्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक दोन टेबलसाठी वर्ग 1 च्या एका अधिकाऱ्याची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एका टेबलवर 500 मतपत्रिकांची मोजणी करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मतमोजणी गोदामापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर आवश्यकतेनुसार बॅरेकेटींग करण्यात आले आहे. मुख्य प्रवेशद्वारावर, मतमोजणी कक्षाबाहेर व मतमोजणी कक्षात ध्वनीक्षेपक लावण्यात येत आहेत.
मतमोजणीचे फेरीनिहाय पडलेले मतदान उपस्थितांना दिसण्यासाठी आवश्यकतेनुसार मतमोजणी कक्षात व माध्यम कक्षात मोठ्या आकाराच्या एलईडी स्क्रीन लावण्यात येत आहेत. महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, उमेदवार व पत्रकार तसेच निवडणूक निरीक्षक यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पोलीस विभागाकडून 3 स्तरावर बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रवेशासाठी तीन वेळा तपासणी (फ्रिस्कींग) केली जाणार आहे. तसेच, मुख्य प्रवेशद्वारावर धातू शोधक यंत्र (मेटल डिटेक्टर) बसविण्यात येत आहेत. तसेच, सांगली व मिरज शहरात तसेच सेंट्रल वेअर हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आवश्यकतेनुसार बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. तसेच प्रवेश बंद केलेल्या ठिकाणापासून मतमोजणी ठिकाणापर्यंत जाण्यासाठी चार बसची सुविधा विनाशुल्क करण्यात आली आहे.मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू मतमोजणी कक्षात नेण्यास परवानगी नसल्याने या वस्तू मतमोजणी कक्षात आणल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याबाबत सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत विभाग) यांच्याकडून सद्यस्थितीत तीव्र उन्हाळा असल्यामुळे आवश्यकतेनुसार पंखे, कुलर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दखल घेण्याबाबत संबंधित विभागास कळविण्यात आलेले आहे. अपवादात्मक परिस्थितीत वीज पुरवठा खंडित झाल्यास जनित्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतमोजणी कक्षातील सर्व संगणक लॅन पद्धतीद्वारे जोडले आहेत. बीएसएनएलकडून ब्रॉडबँड सुविधा व सदरची सुविधा अखंडपणे कार्यरत राहील यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मतमोजणी कक्षाच्या आवारात स्वच्छता, साफसफाई, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच, मतमोजणी कक्षाजवळ दि. 22 व 23 मे 2019 रोजी वैद्यकीय पथकासह सुसज्ज रूग्णवाहिका ठेवण्यात येत आहे.