फोटो ओळ :
चिंचणी (ता. कडेगाव) येथे आमदार मोहनराव कदम यांच्याहस्ते मुस्लिम समाजबांधवांना दफनभूमीच्या जागेच्या मंजुरी आदेशाची प्रत सुपूर्द केली. यावेळी दिग्विजय कदम, जलाल मुल्ला, यासिन इनामदार, अकबर मुल्ला, हारुण मुल्ला आदी उपस्थित होते.
कडेगाव : चिंचणी (ता. कडेगाव) येथे मुस्लिम समाजाच्या मागणी अर्जानुसार येथील गट नंबर १६२९ मधील २० गुंठे शासकीय जमीन मंजूर झाली आहे. प्रांताधिकारी आयुषी सिंह यांच्या मंजुरी आदेशाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला आहे.
कडेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयाकडून मुस्लिम समाज दफनभूमीच्या जागेचा मंजुरी आदेश चिंचणी ग्रामपंचायतीकडे देण्यात आला आहे. चिंचणी ग्रामपंचायतीच्यावतीने आमदार मोहनराव कदम यांनी या आदेशाची प्रत मुस्लिम समाजबांधवांकडे सुपूर्द केली.
दफनभूमीसाठी चिंचणी येथील हारुण मुल्ला यांच्यासह मुस्लिम समाजबांधवांनी १६ मे २०१३ रोजी अर्ज केला होता. यानुसार गट नंबर १४२९ मधील २० गुंठे शासकीय पडिक जमीन देण्याबाबत चिंचणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव मंजूर झाला होता. आवश्यक ती सर्व कागदपत्रे तपासून जिल्हाधिकारी सांगली यांचेकडून ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी मंजुरी आदेश मिळाला होता. या आदेशानुसार कार्यवाही करीत कडेगाव येथील भूमिअभिलेखचे उपअधीक्षक यांना या जागेची मोजणी करून नोंद घेण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय या जागेचा कब्जा ग्रामपंचायत चिंचणी यांचेकडे देऊन कब्जापट्टी, फेरफार व ७ /१२ तसेच अटी व शर्ती मंजूर असलेबाबत प्रतिगृहिता यांचे हमीपत्रासह अहवाल सादर करण्याचे आदेश कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांना दिले आहेत.