सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि लोकांच्या आरोग्यासाठी रात्रं-दिवस पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत, मात्र त्यांच्याच आरोग्याचे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.
पोलीस दलाच्यावतीने नुकत्याच झालेल्या आरोग्य तपासणीत सुमारे २0 टक्के पोलिसांना विविध आजारांनी ग्रासल्याचे दिसून आले. मधुमेह, उच्च रक्तदाब, ताण-तणावासह बहुतांश वेळ बंदोबस्तासाठी उभे राहिल्याने गुडघेदुखीनेही कर्मचारी त्रस्त असल्याचे वास्तव समोर आले आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी व त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस २४ तास तैनात होते. त्यात कोरोनाबाधित आढळलेला परिसर कंटेनमेंट करण्यासह इतर सर्वच ठिकाणी पोलीस आपले कर्तव्य बजावित होते.
या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात होती. पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या पुढाकारातून या कालावधित आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत होते. यात नियमित आरोग्य तपासणीसह इतर व्याधींबाबतही तपासणी होत होती.मिरजेतील प्रख्यात डॉ. विनोद परमशेट्टी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी या तपासणी शिबिरात आपले योगदान दिले होते. यात सर्वाधिक प्राधान्य कोरोनाविषयक तपासणीला देण्यात येत होते. कर्मचाऱ्यांना तापासह इतर लक्षणे असल्यास त्यांची तपासणी करण्यात येत होती व त्यांना औषधोपचार दिले जात होते.
या आरोग्य तपासणी शिबिरात पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मधुमेहाचे सर्वाधिक प्रमाण आढळले. याचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांपर्यंत होते. यानंतर उच्च रक्तदाबानेही पोलीस ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन कालावधित पोलिसांवर ताण कायम होता. संचारबंदीची अंमलबजावणी व इतर कारणांमुळे ते बंदोबस्तावर कायम होते. यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्याबरोबरच आहे त्या व्याधींवरही पोलीस कर्मचारी काळजी घेत होते.अशी घ्यायला हवी काळजी...
- पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेवर आहार घ्यावा
- जेवणातील मिठाचे प्रमाण कमी असावे
- नियमित व्यायामावर भर द्यावा
- बंदोबस्तावर असताना हलका आहार घ्यावा, जेणेकरून त्रास होणार नाही
- गोड, तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यात मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आढळले. ज्या कर्मचाऱ्यांना त्रास होता, त्यांना उपचाराबरोबरच मार्गदर्शनही करण्यात आले.- डॉ. विनोद परमशेट्टी, मिरज