मिरज, इस्लामपूरच्या २०० बसेस एलएनजीवर चालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:30 AM2021-08-19T04:30:33+5:302021-08-19T04:30:33+5:30
सांगली : भविष्यात एस. टी.ला आर्थिक उभारी देण्यासाठी एस. टी. महामंडळाने लिक्विफाईड नॅचरल गॅसच्या (एलएनजी) दिशेने पावले टाकण्याचा निर्णय ...
सांगली : भविष्यात एस. टी.ला आर्थिक उभारी देण्यासाठी एस. टी. महामंडळाने लिक्विफाईड नॅचरल गॅसच्या (एलएनजी) दिशेने पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मिरज, इस्लामपूर आगारातील २०० बसेस एलएनजीवर चालविण्यात येणार आहेत. यासाठी दोन्ही आगारांत एलएनजी पंपांसाठी जागा देण्यात येणार असून त्या मोबदल्यात एस. टी.ला मोफत गॅस मिळणार आहे.
सध्या एस. टी. महामंडळाच्या सांगली विभागाकडे साडेसातशे बस आहेत. या सर्व बस डिझेलवर धावतात. एस. टी.च्या एकूण महसुलाच्या ३४ टक्के रक्कम इंधन खरेदीवर खर्च होते. भविष्यात या खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने टप्प्या-टप्प्याने सध्या तांत्रिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या बसेस डिझेल इंधनावरून एलएनजी इंधनावर रूपांतरित करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात इस्लामपूर, मिरज आगारातील २०० बस एलएनजी इंधनावर रूपांतरित करण्यात येतील, असे एस. टी. महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. एस. टी.च्या कार्यशाळांमध्ये एस. टी. बसेसची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या बसेस कशापद्धतीने चालतील, त्यावरच जिल्ह्यातील उर्वरित आठ आगारांमधील बसेस एलएनजीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत.
एलएनजी पंपासाठी मिरज, इस्लामपूर आगारातील जागा देण्यात येणार आहे. या जागेच्या मोबदल्यात सर्व बसेसना मोफत गॅस मिळणार आहे. उर्वरित गॅस खासगी वाहनांसाठी ती कंपनी देणार आहे. त्यादृष्टीने खासगी कंपनीने वाळवा आणि मिरज तालुक्यातील वाहनांचा सर्व्हे केला आहे तसेच जागेचीही पाहणी केली आहे. येत्या सहा महिन्यांत मिरज आगारातील १०० आणि इस्लामपूर आगारातील १०० अशा २०० बसेस एलएनजीवर धावणार आहेत.
चौकट
प्रदूषण रोखण्याला प्राधान्य : अरुण वाघाटे
केंद्र आणि राज्य शासनाने प्रदूषणमुक्त धोरण राबविण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार एलएनजीवर पहिल्या टप्प्यात मिरज, इस्लामपूर आगारातील २०० बसेस धावणार आहेत. त्यामुळे इंधनावरील मोठा खर्च कमी होणार असल्यामुळे एस. टी. नफ्यात येण्यास मदत होणार आहे, अशी माहिती एस. टी. महामंडळाच्या सांगली विभागाचे विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी दिली.
चौकट
एस. टी.च्या सांगली विभागाला १०४ इलेक्ट्रीक बस येणार
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सांगली विभागाला पहिल्या टप्प्यात १०४ इलेक्ट्रीक बस येणार आहेत. त्यामुळे लवकरच सांगलीतील रस्त्यांवर इलेक्ट्रीक बसेस धावणार आहेत. या बसमुळे महामंडळाच्या इंधन खर्चात तब्बल ६० टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे. लवकरच या बसेस सांगली विभागाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. बारा मीटर लांब आणि ४४ प्रवासी क्षमता आहे. प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना बसेसची उत्सुकता लागली आहे.