सांगली : आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी या टेस्टसाठी घाबरून जाऊ नये, उलट ही चाचणी विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण आहे. लवकरच जिल्हाभरात २० हजार चाचण्या घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.रॅपिड अॅन्टिजेन टेस्टच्यासंदर्भात होत असलेल्या चर्चा व संभ्रमाच्या वातावरणाबाबत जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी व निदान लवकर झाल्यास बाधितांवर उपचार सुलभ होत असल्याने ही चाचणी महत्त्वाची आहे. ज्या ठिकाणी अशा रॅपिड अँटिजेन चाचण्या यंत्रणांमार्फत सुरू आहेत, त्या ठिकाणी अडथळा निर्माण करू नये. स्वत:च्या सुरक्षेसाठी ही चाचणी महत्त्वाची असल्याने त्यास सहकार्य करावे.सध्या नियमितपणे आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात येतात. याचे निदान समजण्यास उशीर लागतो. त्यामुळे उपचारासही विलंब लागतो. त्यामुळे ही चाचणी महत्त्वाची आहे. संपूर्ण देशात या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे त्याबाबत कोणतेही संभ्रम असण्याचे कारण नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.महापालिका क्षेत्रात रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात येत असून लवकरच ग्रामीण भागात त्या सुरू करण्यात येत आहेत. सध्या जिल्ह्यात किमान २० हजार रॅपिड अँटिजेन चाचण्यांचे नियोजन आहे.
यात प्राधान्याने ५० वर्षावरील व्यक्तींच्या, तसेच दाटीवाटीच्या लोकवस्तीमधील, कंटनमेंट झोनमध्ये या टेस्ट करण्यात येणार आहेत. या टेस्टबद्दल पसरविण्यात येणाºया अफवांवर विश्वास ठेवू नयेत. अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रूग्णांवर उपचारास अडचण नाहीजिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, त्यांच्यावरील उपचारास कोणतीही अडचण येत नाही. महापालिका क्षेत्रात मोठ्या रूग्णालयात उपचाराची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे बेडची सोय करण्यात आली आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेतून उपचारासही प्राधान्य देण्यात येत आहेत.