जिल्ह्यातील २०८ उमेदवार निवडणुकीसाठी ठरले अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:50+5:302021-01-01T04:18:50+5:30
सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची रणधूमाळी चांगलीच रंगली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रीया पूर्ण झाल्याने निवडणूकीत खरी ...
सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची रणधूमाळी चांगलीच रंगली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रीया पूर्ण झाल्याने निवडणूकीत खरी रंगत येत आहे. मात्र, २०१५ च्या ग्रामपंचायत निवडणूकीत नशीब आजमावलेल्या ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब प्रशासनाला सादर केला नाही अशा २०८ जणांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे इच्छा असूनही हिशोब देण्यास चालढकल करणाऱ्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक निवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन केले जाते. त्यानुसार निवडणूक लढवत असलेल्या प्रत्येक उमेदवाराने आपला प्रचारासह निवडणूक कालावधीतील सर्व खर्च प्रशासनाला सादर करणे बंधनकारक आहे. तरीही खर्चाचा ताळेबंद सादर न करणाऱ्यांवर थेट अपात्रतेची कारवाई केली जाते. त्यानुसार २०१५ च्या निवडणूकीत खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना ही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. या आशयाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना दिल्या आहेत. त्यात उमेदवारांचे नाव, त्यांचे गावासहची यादी जोडण्यात आली आहे. गेल्या निवडणूकीत खर्चाचा हिशोब न देता यंदा पुन्हा निवडणूकीत उतरलेल्या उमेदवारांचा अर्ज छाननीवेळी बाहेर पडणार असल्याने निवडणूकीवर पाणी सोडावे लागणार आहे.