सांगली : मागील दीड वर्षापासून प्रलंबित असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संचमान्यता अखेर पूर्ण झाली. जानेवारी २०१८ अखेर विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता करण्यात आली असून, दोन हजार २०७ विद्यार्थी संख्या घटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जवळपास शंभर शिक्षकांची पदे कमी होणार आहेत.
जिल्हा परिषदेतील विद्यार्थी संख्येनुसार दरवर्षी सप्टेंबरअखेर पट निश्चिती केली जाते. चालू शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये निश्चिती झाली नव्हती. त्यानुसार संचमान्यताही रखडली होती. गेल्या तीन महिन्यांपासून संचनिश्चिती करण्याचे काम सुरू होते. अखेर जानेवारी २०१८ च्या पटसंख्येच्या विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता देण्यात आली. सप्टेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या पटसंख्येत एक लाख २६ हजार विद्यार्थी संख्या होती, ती एक लाख २३ हजार ७९३ आहे. दीड वर्षात दोन हजार २०७ विद्यार्थी संख्या घटल्याचे स्पष्ट झाले.
विद्यार्थी संख्या घटत चालल्यामुळे सुमारे शंभर शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. या शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.
शिक्षक, मुख्याध्यापकांची सहा हजार ४३१ पदे असून, पाच हजार ८०६ कार्यरत आहेत. संचमान्यतेनुसार ५२५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामध्ये उपशिक्षकांची पाच हजार २४ पदे मंजूर आहेत. सध्या चार हजार ६४५ पदे कार्यरत आहेत. पदवधीर शिक्षक एक हजार ४९ असून, ९३१ कार्यरत, तर मुख्याध्यापकांची ३५८ पदे मंजूर असली तरी, २२० कार्यरत आहेत. संचमान्यता निश्चित झाल्याने शिक्षक समायोजन प्रक्रिया होणार आहे. मात्र ही समायोजन प्रकिया शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला करावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये, असे यापूर्वीचे आदेश आहेत. त्यामुळे समायोजन प्रक्रिया तात्काळ पूर्ण होणार का? याबाबत शिक्षकांत उत्सुकता असणार आहे.खासगी शाळांचा झेडपीच्या शाळांना फटकाखासगी अनुदानित शाळा १८०, विनाअनुदानित शाळा २२, कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा ८६ आणि स्वयंअर्थसहाय्यता शाळा १२४ अशा २३१ शाळांची संख्या झाली आहे. खासगी शाळांची संख्या वाढत चालल्याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषद शाळांना बसत असून, वर्षाला शंभर शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. भविष्यात या शिक्षकांच्या नोकऱ्याही टिकणे कठीण होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.