तासगावच्या रथोत्सवाची २३९ वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:50 PM2018-09-09T23:50:42+5:302018-09-09T23:50:46+5:30
दत्ता पाटील
मराठा साम्राज्याचे पेशवेकालीन सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी १७७९ मध्ये तासगावच्या या ऐतिहासिक रथोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत गेली २३८ वर्षे अव्याहतपणे रथोत्सवाची ही परंपरा सुरु आहे. यंदा २३९ वा उत्सव आहे. तासगावच्या संस्थानचा गणपती दीड दिवसाचा असतो. या गणपतीची विसर्जन मिरवणूक म्हणजेच रथोत्सव होय. मिती भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी दुपारी या रथोत्सवास सुरुवात होते. रथासमोर संस्थानचा हत्ती दिमाखात चालत असतो. पालखी, गुलाल, पेढे, खोबऱ्याची उधळण, मंगलमूर्तीचा जयघोष, झांजपथक यामुळे वातावरण भक्तिमय होते. तरुण पिढी मानवी मनोरे उभारून आनंद लुटते. काशीविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ आल्यानंतर तो पुन्हा गणपतीच्या मंदिराकडे येतो व पुन्हा परत गणपती मंदिरापर्यंत रथ ओढला जातो व रथोत्सव संपतो. महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही हजारो भाविक हा रथोत्सव पाहण्यासाठी येत असतात.