करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे गेटेड बंधाऱ्यासाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. आमदार अनिल बाबर यांच्या विशेष प्रयत्नांतून निधी मंजूर झाल्याने शेटफळे गावातून आनंद व्यक्त होत आहे.
शेटफळे गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट राहिलेला बंधारा होता.
या बंधाऱ्याची उर्वरित काम व्हावे, यासाठी अनेकवेळा राजकीय नेतेमंडळींकडे शेटफळेतील ग्रामस्थांनी साकडे घातले होते. अनिल बाबर यांच्या विशेष प्रयत्नांतून मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विशेष निधी देत शेटफळेकराच्या मागणीला यश मिळाले आहे. शेटफळेतील गुलाब गायकवाड यांच्या शेताशेजारील बंधाऱ्यासाठी ९० लाख ३९ हजार रुपये, संजय माने यांच्या शेतालगत बंधाऱ्यासाठी ८७ लाख ३९ हजार रुपये, तर जिल्हा परिषद शाळा नं.एकच्या पाठीमागील ओढापात्रातील बंधाऱ्यासाठी ६२ लाख ६८ हजार रुपये मंजूर झाले आहेत. शेटफळेतीळ शेकडो एकर क्षेत्र या बंधाऱ्यांच्या पाण्याने ओलिताखाली येणार आहे. शिवसेना नेते तानाजीराव पाटील यांनी लक्ष घालत शेटफळेतील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला न्याय देत अनिल बाबर यांनी दोन कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर केल्याने शेटफळेतील अपूर्ण कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.