रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथील होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोविड रुग्णांसाठी रेठरे धरण ग्रामपंचायतीमार्फत येथील आश्रमशाळेतील हॉलमध्ये ३० बेडचा विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. त्यामुळे साधी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होणार आहे.
रेठरे धरण येथील लोकसंख्या सुमारे आठ हजार असून गावात गेले दोन महिन्यांपासून कोरोनाचा फैलाव होत आहे. ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखाना, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, डॉक्टर्स, आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी मॅडम, लोकप्रतिनिधी, कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
रेठरे धरण येथील प्राथमिक आश्रमशाळेत असणाऱ्या कोविड सेंटर विलगीकरण कक्षात, दररोज दोनवेळेस जेवण, पुरुष व महिलावर्गासाठी वेगळे बाथरूम, शौचालय, पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. कोरोना लक्षणे असणाऱ्यांनी कोविड रुग्णांनी कोविड विलगीकरण कक्षात दाखल व्हावे, असे आवाहन सरपंच लतिका पाटील यांनी केले आहे.