जत : जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीला आमदार फंडातील ३० लाख रुपयांचा निधी, तसेच शासनाकडून येणारा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.
ते म्हणाले, ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आपापसातील हेवेदावे, मतभेद, गटातटाचे राजकारण निर्माण होऊन सत्तासंघर्ष तयार होतो; यामुळे काहीवेळा विकास कामात आडथळा येत आहे. गावपातळीवरील लोकांमध्ये आपापसात एकोपा निर्माण होण्यासाठी निवडणुका बिनविरोध होणे अपेक्षित आहे. बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीला विविध शासकीय योजनेतून मिळणाऱ्या सोयी-सवलती व आमदार फंडातील ३० लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने घेण्यात आला आहे. मागील दहा महिन्यांत कोरोनामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. आपण सर्वजण कोरोनाचा मुकाबला करत आहोत. यामुळे निवडणुका बिनविरोध करून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब बिराजदार उपस्थित होते .
चाैकट
प्रयत्नांची गरज
आमदार विक्रम सावंत म्हणाले की, तालुक्यात तीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने गटतट, भाऊबंदकी, राजकीय रोष व सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी बिनविरोध निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा.