जिल्ह्यात बारावीचे ३३ हजार, दहावीचे ४० हजार विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:22 AM2021-04-03T04:22:53+5:302021-04-03T04:22:53+5:30
सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची दि. २३ एप्रिल तर दहावीची ...
सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची दि. २३ एप्रिल तर दहावीची परीक्षा दि. २९ एप्रिलपासून ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. जिल्ह्यात बारावीसाठी ३३ हजार ९० विद्यार्थी तर दहावीसाठी ४० हजार ८४४ विद्यार्थी परीक्षा देतील. परीक्षेची सर्व ती तयारी झाली आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली.
शिक्षणाधिकारी कांबळे म्हणाले की, राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा दि. २३ एप्रिल ते दि. २१ मे तर दहावीची दि. २९ एप्रिल ते दि. २९ मे दरम्यान होणार आहे. बारावीसाठी ४९ केंद्रे आणि ३३ हजार ९० परीक्षार्थी आहेत तर दहावीसाठी १०३ केंद्रे आणि ४० हजार ८४४ परीक्षार्थी आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षेची सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. सात भरारी पथकांसह विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाढत्या कोरोनामुळे परीक्षेबाबत पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र, परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला नाही. परीक्षेची तयारी झाली आहे. पूर्वीप्रमाणे एका बेंचवर एक विद्यार्थी याप्रमाणेच बैठक व्यवस्था केली आहे. परीक्षेबाबत नवीन मार्गदर्शक कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करून घेऊ नये. विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्रिका देणार आहे. त्यांनी वेळेत प्रवेशपत्रिका घ्याव्यात. जेणेकरून परीक्षेच्या दिवशी गोंधळ होणार नाही. विद्यार्थी आणि पालकांनी याची दक्षता घ्यावी.
चौकट
शाळांकडून शुल्कची सक्ती नको
जिल्ह्यातील काही अनुदानित शाळा विद्यार्थ्यांकडून शुल्कची मागणी करीत आहेत. अनुदानित शाळांनी कोणतेही शुल्क आकारायचे नाही. नियमानुसार शुल्क घेता येत नाही, कोणी शुल्क घेत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शाळेवर कडक कारवाई केली जाईल, शुल्कसाठी अडवणूक होत असेल तर पालकांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी कांबळे यांनी केले. खासगी शाळांनीही शुल्कासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये, असे आवाहन कांबळे यांनी केले.