जिल्ह्यात २२५ जणांचे ३५९ उमेदवारी अर्ज
By Admin | Published: September 28, 2014 12:42 AM2014-09-28T00:42:40+5:302014-09-28T00:44:39+5:30
विधानसभा निवडणूक : अखेरच्यादिवशी १३२ जणांची उमेदवारी
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज (शनिवार) संपली. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतून आजअखेर २२५ जणांनी ३५९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी १३२ जणांचे २०० अर्ज दाखल झाले. सर्वाधिक उमेदवारी अर्ज सांगलीतून (३८), तर सर्वात कमी उमेदवारी शिराळा मतदारसंघातून (१५) दाखल झाले आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी व भाजप-शिवसेनेची युती तुटल्याने सर्वच पक्षांमध्ये गोंधळ होता. आज सकाळपर्यंत उमेदवारांबाबत संभ्रमावस्था होती. पक्षाचे एबी फॉर्म दुपारी दोनपर्यंत देण्यात येत होते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गर्दी झाल्याने प्रशासनावरही ताण वाढला होता. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत कोणाकोणाची उमेदवारी दाखल झाली, याची माहिती विविध ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मिळत नव्हती.
जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत आजअखेर २२५ जणांनी ३५९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज भरण्याची मुदत आज संपली असून, सोमवारी (२९ सप्टेंबर) अर्जांची छाननी होणार आहे. माघारीसाठी बुधवार (१ आॅक्टोबर) दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. १५ आॅक्टोबररोजी (बुधवार) मतदान होणार असून, १९ आॅक्टोबरला (रविवार) मतमोजणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
सांगली : मदन पाटील (कॉँग्रेस), संभाजी पवार (अपक्ष), सुरेश पाटील (राष्ट्रवादी), धनंजय (सुधीर) गाडगीळ (भाजप), पृथ्वीराज पवार (शिवसेना).
इस्लामपूर : जयंत पाटील (राष्ट्रवादी) नानासाहेब महाडिक (अपक्ष), भीमराव माने (शिवसेना), जितेंद्र पाटील (काँग्रेस).
तासगाव/ कवठेमहांकाळ : आर. आर. पाटील (राष्ट्रवादी), अजितराव घोरपडे (भाजप), सुरेश शेंडगे (काँग्रेस).
जत : विलासराव जगताप (भाजप), प्रकाश शेंडगे (राष्ट्रवादी), विक्रम सावंत (काँग्रेस)
मिरज : सिद्धार्थ जाधव (काँग्रेस), बाळासाहेब होनमोरे (राष्ट्रवादी), आनंद डावरे (जनसुराज्य).
शिराळा : सत्यजित देशमुख (काँग्रेस), मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी), शिवाजीराव नाईक (भाजप)
पलूस/ कडेगाव : पतंगराव कदम (काँग्रेस), पृथ्वीराज देशमुख (भाजप), संदीप राजोबा (अपक्ष)
खानापूर : सदाशिवराव पाटील (काँग्रेस), अनिल बाबर (शिवसेना), गोपीचंद पडळकर (भाजप), अमरसिंह देशमुख (राष्ट्रवादी)