सांगली : रेंगाळलेली कर्जमाफीची प्रक्रिया आता गतिमान झाली असून, सोमवारी नियमित कर्ज फेडणाºया २१ हजार ८५ शेतकºयांसाठी ३६ कोटी ३८ लाखांचे प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाले आहे. दीड लाखापर्यंतचे आणि दीड लाखावरील शेतकºयांनाही कर्जमाफीची रक्कम मंजूर झाली असून, जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना १०६ कोटी २५ लाख ४३ हजार रुपयांचा लाभ या योजनेअंतर्गत होणार आहे.
सांगली जिल्ह्यात कर्जमाफीसाठी १ लाख ८६ हजार कुटुंबांचे अर्ज दाखल झाले होते. यातील १ लाख ७१ हजार कर्जदारांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा बँकेला, तर ५१ हजार कर्जदारांची माहिती देण्याचे आदेश अन्य बँकांना दिले होते. छाननीमध्ये यातील अनेकजण एकाच कुटुंबातील असल्यामुळे ही संख्या कमी झाली. जिल्ह्यातील ७६३ सोसायट्यांची माहिती अपलोड करून ती शासनाच्या आयटी विभागाला पाठविली होती. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा १ हजार शेतकºयांचे अर्ज सोसायट्यांमधील माहितीशी पडताळणी करण्यासाठी प्राप्त झाले होते. आठवड्यात फेरपडताळणी करून ती शासनाकडे पाठविली होती.
फेरपडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीच्या रेंगाळलेल्या प्रक्रियेला आता गती प्राप्त झाली आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना १०६ कोटी २५ लाख ४३ हजार ५७४ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यात दीड लाखांपर्यंत कर्ज असणाºया १९ हजार शेतकºयांचा सात-बारा कोरा झाला असून, त्यांना एकूण ७० कोटी १४ लाख १८ हजार ९६४ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. नियमित कर्ज भरणाºया २१ हजार ८५ शेतकºयांना ३६ लाख ३८ हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त झाले आहे. यासंदर्भातील यादी शुक्रवारी संकेतस्थळावर जाहीर झाली होती.
सोमवारी जिल्हा बॅँकेला याबाबतची माहिती आणि आकडेवारी प्राप्त झाली. दीड लाखांच्या आतील शेतकºयांची मंजूर झालेली रक्कम जिल्हा बॅँकेने शनिवारी संबंधित सोसायट्यांच्या खात्यांवर वर्ग केल्याने सोसायटी स्तरावरही आता या प्रक्रियेस गती प्राप्त झाली आहे. बहुतांश शेतकºयांचा सात-बारा कोरा झाल्याचे सांगितले. शेतकºयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी फेरपडताळणी करण्यात आली होती. त्याबाबतची मंजुरी सोमवारी जिल्हा बॅँकेला प्राप्त झाल्याने आता हा प्रश्नही निकालात निघाला आहे.जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी सांगितले की, आजवर शेतकºयांच्या खात्यावर १२ कोटीच्या रकमा वर्ग झाल्या असून, प्रक्रिया गतीने सुरू आहे.