सांगली : गेली सलग पाच वर्षे बँकेला नफ्याच्या शिखरावर पोहोचविण्यात मोलाचे योगदान दिल्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांना ४.५२ टक्के पगारवाढ दिली आहे. पाच वर्षातील ही दुसरी पगारवाढ असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी दिली.
सांगली जिल्हा बँक, बँकेचे व्यवस्थापन आणि को - ऑप. बँक एम्प्लॉईज् युनियन यांच्यात जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याबद्दल रविवारी करार करण्यात आला. हा करार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२३ या ४ वर्षांसाठी लागू करण्यात आला आहे. पगारवाढ करार सोहळा बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये
पार पडला. करारावर बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील व को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंतराव कडू-पाटील, बँकेचे संचालक सिकंदर जमादार, विशाल पाटील, चिमण डांगे, उदयसिंह देशमुख, डॉ. प्रताप पाटील, श्रीमती कमलताई पाटील, सौ. श्रध्दाताई चरापले, युनियनच्यावतीने सरचिटणीस प्रदीप पाटील, सल्लागार डी. के. (काका) पाटील व युनियनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दिलीपतात्या पाटील म्हणाले की, बँकेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे बहुमोल योगदान असल्याने व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टपणे काम केल्यामुळेच बँकेस चांगला नफा होत आहे. त्यामुळेच ही पगारवाढ कर्मचाऱ्यांना दिली आहे. पाच वर्षातील ही दुसरी पगारवाढ आहे. अडसूळ म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये अखंडितपणे बँकिंग सेवा देऊन चांगल्या पध्दतीचे कामकाज केले आहे. त्यामुळे ते या लाभास पात्र ठरतात. त्यांनी यापुढेही बँकेसाठी असेच काम करावे, असे आवाहन केले.