जिल्ह्यात ५२ टक्के जलसाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:26 AM2021-03-05T04:26:07+5:302021-03-05T04:26:07+5:30
सांगली : थंडीची हुडहुडी कमी होत आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अजून झळांची तीव्रता वाढली नसली तरी टंचाईची चाहूल ...
सांगली : थंडीची हुडहुडी कमी होत आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अजून झळांची तीव्रता वाढली नसली तरी टंचाईची चाहूल मात्र, जिल्ह्यात दिसून येत आहे. यंदा चांगले पाऊसमान झाल्याने जिल्ह्यातील सर्व जलसाठे समाधानकारक भरले होते. मात्र, त्यानंतर आता मात्र, ५२ टक्क्यांहून अधिक साठे हे मृतसंचयाखाली गेल्याने पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्याच्या पूर्व भागात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होते. गेल्या काही वर्षांपासून या भागातही पाणी योजनांची आवर्तने होत असल्याने या भागातही जलसाठे भरलेले असतात. यंदा परतीच्या मान्सूनने चांगली हजेरी लावल्याने तलाव अद्याप तरी भरलेले आहेत. सध्या जिल्ह्यातील ४ तलावांतील पाणीसाठा मृतसंचयाखाली गेला आहे, तर ३२ तलावांमध्ये २५ ते ५० टक्के साठा उपलब्ध आहे. जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील तलावांत अद्यापही २५ टक्के जलसाठा आहे.
दोन दिवसांपूर्वी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाले आहे. त्यामुळे मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्याला त्याचा लाभ मिळणार आहे. यासह टेंभूच्या पाण्याची प्रतीक्षा असणार आहे.
यावर्षी विशेष म्हणजे दरवर्षी सर्वाधिक टंचाई भासणाऱ्या आटपाडी, कवठेमहांकाळ, जत तालुक्यात समाधानकारक जलसाठे उपलब्ध आहेत. आटपाडी तालुक्यात अद्यापही ६८ टक्के साठा उपलब्ध आहे, तर कवठेमहांकाळ तालुक्यातही ६४ टक्के साठा आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
चौकट
...तर विहिरींचे अधिग्रहण होणार
जिल्हा प्रशासनाने मात्र, टंचाई आराखडा तयार केला असून, ज्या भागात पाण्याची टंचाई जाणवणार आहे, त्या भागातील ग्रामस्थांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी तहसील पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन, विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात येत आहे. यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यास अधिग्रहण लवकर केले जाणार आहे.
चौकट
तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त साठा टक्केवारी
तासगाव ७ ६०
खानापूर ८ ५४
कडेगाव ७ ५२
शिराळा ५ ४४
आटपाडी १३ ६८
जत २८ ४५
कवठेमहांकाळ ११ ६४
मिरज ३ ४६
वाळवा २ ३६
पलूस ० ०
एकूण ८४ ५२ टक्के