माधवनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणास ५.६७ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 04:35 PM2020-09-28T16:35:54+5:302020-09-28T16:38:37+5:30
सांगली-माधवनगर रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी सेंट्रल रेल्वेकडून १७.५९ कोटी इतक्या रकमेची मंजुरी मिळाली असून पुलाच्या वाढीव ५ कोटी ६७ लाखाच्या कामाला तसेच चौपदरीकरणाला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली
सांगली : सांगली-माधवनगर रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी सेंट्रल रेल्वेकडून १७.५९ कोटी इतक्या रकमेची मंजुरी मिळाली असून पुलाच्या वाढीव ५ कोटी ६७ लाखाच्या कामाला तसेच चौपदरीकरणाला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.
पाटील म्हणाले की, माधवनगर रेल्वे पुलाच्या विस्तारीकरणाच्या अनुषंगाने सतत पाठपुरावा सुरु होता. याबाबत मुंबईत सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी त्यांच्या दालनात सार्वजनिक बांधकाम आणि सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह नुकतीच एक बैठक घेतली. यावेळी मी उपस्थित होतो.
पुलाच्या वाढीव कामाच्या मंजुरीसाठी पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचेही सहकार्य लाभले. मिरज - पुणे रेल्वेमार्गाचे सध्या दुहेरीकरणाचे काम चालू आहे. त्यामध्ये महापालिका हद्दीतील माधवनगर पुलाचेही विस्तारीकरण करण्यात येणार आहे, परंतु त्यामध्ये अपुरेपणा होता. हा पूल १०.५० मिटर मार्गीकेचा आणि १२ मीटर रुंदीचा प्रस्तावित होता. त्यासाठी सेंट्रल रेल्वेकडून १७.५९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. परंतु या मार्गावरील वाढती वाहतूक आणि अरुंद पुलामुळे अपघात वाढले असल्याने त्याची रुंदी १८ मीटर व्हावी अशी मागणी आपण केली होती.
या वाढीव कामासाठी ५.६७ कोटी रुपये ज्यादा खर्च येणार आहे त्याला मान्यता मिळावी अशी विनंती मी बैठकीत केली. हे वाढीव काम रेल्वेने स्वखर्चाने करावे, रेल्वेच्या नियमांमध्ये १२ मीटर रुंदी वरील खर्चाची जबाबदारी रेल्वेकडे येत नाही असे रेल्वे अधिकाऱ्यानी स्पष्ट केले त्यावर रेल्वेने पैसे न दिल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग तो खर्च उचलेल असे चव्हाण म्हणाले.
या निर्णयामुळे माधवनगर रेल्वे उड्डाणपुलाचे चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे पाटील यांनी सांगितले. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव ( रस्ते ) यू. पी. देबडवार, उपसचिव एस. एल. टोपले, अवर सचिव चिवटे उपस्थित होते.
पुणे विभागाचे मुख्य अभियंता एस. एस.साळुंखे, कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता सं. शि. माने, मिरज विभागाचे कार्यकारी अभियंता सं. भो. रोकडे, सेंट्रल रेल्वे मिरज विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. चौधरी हेसुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.