सांगली : महापालिकेच्या वीज बिलामध्ये ५० ते ६० लाखाचा घोटाळा झाला आहे. एका खासगी संस्थेकडे वीज बिलाचा भरणा केला जात होता. या संस्थेने महावितरणकडे पैसेच भरले नसल्याची बाब समोर आली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी घोटाळ्याला दुजोरा दिला असून घोटाळ्याची कबुली दिली आहे. त्यामुळे विद्युत व लेखा विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
महापालिकेचे मुख्यालय, विविध कार्यालये, पाणीपुरवठा, दिवाबत्तीसह विविध विभागांची वीज बिले दरमहा विद्युत विभागाकडे येतात. या बिलापोटीची रक्कम शहरातील एका खासगी वीज बिल भरणा केंद्राकडे जमा केली जाते. या केंद्राच्यावतीने बिलाची रक्कम महावितरण कंपनीकडे जमा होते. पण गेल्या वर्षभरापासून अनेक विभागांची बिले भरली गेलेली नाहीत. काही महिन्यांपूर्वी वीज महावितरण कंपनीकडून महापालिकेला वीज बिल भरण्याबाबत पत्र पाठविल्यानंतर हा प्रकार समोर आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.याच काळात महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असल्याने त्याकडे पदाधिकारी, नगरसेवकांनी फारसे लक्ष दिले नाही. पण प्रशासनातील वरिष्ठांना हा प्रकार माहीत होता. जवळपास कोटीची बिले भरली गेली नसल्याचे समजते. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावर परस्परच पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
महावितरण कंपनीतील एका अधिकाऱ्यामुळे ही बाब नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांना कळाली. त्यांनी तातडीने आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे तक्रार केली आहे. आता आयुक्तांनीही घोटाळ्याला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार केल्याचे सांगितले.महापालिकेचे वीज बिल एका भरणा केंद्राच्या कर्मचार्याकडे धनादेश दिले होते. मात्र त्याने धनादेशाची रक्कम दुसर्या वीज ग्राहकाच्या बिलापोटी वजा केली आणि ग्राहकाकडून रोख पैसे घेतले. यातून महापालिकेची फसवणूक झाली आहे. याबद्दल विद्युत विभागाचे अमर चव्हाण यांनी आठवडभरापूर्वीच बिल देणारे कर्मचारी, वीज बिल भरणा करून घेणार्या संस्थेचे कर्मचारी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे, असे कापडणीस यांनी सांगितले.
महापालिकेचे अधिकारी व भरणा केंद्राने संगनमताने गैरव्यवहार केल्याचे समजते. हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. वीज बिलाच्या थकबाकीची रक्कमही कोटीच्या घरात दिसते. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा व संबंधित अधिकाऱ्यावर कारवार्ई करावी.- सतीश साखळकर,
जिल्हाध्यक्ष नागरिक जागृती मंच