सांगली : जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू असली तरी दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे. याचवेळी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने नदी पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणांतून होणारा विसर्ग व पाण्याची पातळी यावर प्रशासनाचे लक्ष असून, यंदा पुराचा धोका बसू नये यासाठी प्रशासनाने यापूर्वीच नियोजन केले आहे.२०१९ व २०२१ मध्ये जिल्ह्याने महापुराचा अनुभव घेतला होता. गेल्यावर्षी महापुराची दाहकता तुलनेने कमी असलीतरी शेतीसह मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.
२४ तास मदतीसाठी यंत्रणापूरग्रस्तांना मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू करण्यात आले आहे. २४ तासांसाठी हा कक्ष कार्यरत आहे. या कक्षासाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांक तर ०२३३-२६००५०० या क्रमांकावर माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात १०४ पूरग्रस्त गावे
जिल्ह्यातील शिराळा वाळवा, पलूस व मिरज या चार तालुक्यांतील वारणा व कृष्णा नदीमुळे पुराच्या पाण्याचा फटका अधिक बसतो. १०४ गावांबरोबरच महानगरपालिका क्षेत्रात प्रशासनाने दक्षता घेतली असून, जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.
सर्वसाधारण पातळी व इशारा पातळीआयर्विन पुलाजवळ सर्वसाधारण पूर पातळी ३५ फूट, इशारा पातळी ४०, तर धोकादायक पातळी ४५ फूट निश्चित करण्यात आली आहे. २०१९ मध्ये महापुराची उच्चतम पातळी ५७.६० फूट होती. अंकली पुलाच्या ठिकाणी सर्वसाधारण पूरपातळी ४० फूट असून, इशारा पातळी ४५.११ फूट असून, सध्या धोकादायक पातळी ५०.३ आहे.
पूरनियंत्रणासाठी यंत्रणा
पूरनियंत्रणासाठी महानगरपालिकेकडे नऊ बोटी, जिल्हा परिषदेकडे ५५ बोटी, महसूल विभागाकडे १९ बोटी अशा एकूण ८३ बोटी उपलब्ध आहेत. मिरज तालुक्यात १७ गावांमध्ये लाइफ जॅकेट १७०, टॉर्च ३४, रोप ५१, बॅग ५१, मेगा फोन १७, लाइफ रिंग ५१, पलूस तालुक्यात २१ गावांमध्ये लाइफ जॅकेट २१०, टॉर्च ४२, रोप ६३, बॅग ६३, मेगा फोन २१, लाइफ रिंग ६३, वाळवा तालुक्यात ३१ गावांमध्ये लाइफ जॅकेट ३१०, टॉर्च ६२, रोप ९३, बॅग ९३, मेगा फोन ३१, लाइफ रिंग ९३, शिराळा तालुक्यात सहा गावांमध्ये लाइफ जॅकेट ६०, टॉर्च १२, रोप १८, बॅग १८, मेगा फोन सहा, लाइफ रिंग १८ साहित्य उपलब्ध आहेत.