जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी हंगामास सुरुवात केली होती. ऊसक्षेत्र जास्त असले तरी कर्नाटक सीमाभागासह कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांची संख्या वाढल्यामुळे बहुतांशी ऊसगाळप झाले आहे. किरकोळ ऊस शिल्लक असल्यामुळे राजारामबापू कारखान्याचे साखराळे व वाटेगाव हे दोन युनिट चालू आहेत. येत्या आठवडाभरात तेही बंद होणार आहेत. राजारामबापू कारखान्याचे कारंदवाडी आणि तिप्पेहळ्ळी युनिट बंद झाले आहे. त्यांच्या चार युनिटने २० लाख १९ हजार ५७२ टन ऊस गाळप करून २३ लाख ५० हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या कारखान्यानेही एकरकमी एफआरपी दिली नाही.
वसंतदादा कारखाना चालवत असलेल्या दत्त इंडिया कारखान्यानेही एकरकमी एफआरपीची घोषणा केली. पण, प्रत्यक्षात दिलीच नाही. त्यांनी आठ लाख ७७ हजार ४७० टन ऊस गाळप करून दहा लाख ३२ हजार ६८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेऊन हंगाम बंद केला आहे. हुतात्मा, क्रांती, विश्वास, यशवंत शुगर, तासगाव या कारखान्यांचे गळीत हंगाम येत्या आठ दिवसांत बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या कारखान्यांनीही शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीपासून दूरच ठेवले आहे.
जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांकडे फेब्रुवारीपर्यंतचे ८५० कोटी रुपये थकीत आहेत. यामध्ये मार्च महिन्यातील दीडशे कोटींच्या थकबाकीची भर पडणार आहे. थकीत एफआरपी सर्वच कारखाने दोन टप्प्यांमध्ये देण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
साेनहिरा, उदगिरी शुगर, मोहनराव शिंदे, दालमिया या चार कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.