शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने २०१९-२० या आर्थिक वर्षात व्हॅट व जीएसटी करापोटी ८६ कोटी २१ लाख रुपयांचा भरणा करीत, शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. शासनास सर्वाधिक महसूल उपलब्ध करून दिल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कारखान्याचे विशेष अभिनंदन केले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या आर्थिक वर्षात सर्वच संस्थांना मोठ्या आर्थिक अडचणीतून वाटचाल करावी लागली. मात्र अशा परिस्थितीतही कृष्णा कारखान्याने अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत, सहकार व उद्योग क्षेत्रांत स्वत:ची छाप पाडली. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने शासनाकडे व्हॅट करापोटी ७७ कोटी १६ लाख रुपये आणि जीएसटीपोटी ९ कोटी ५ लाख असा एकूण ८६ कोटी २१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. सातारा जिल्ह्यात इतक्या मोठ्या रकमेचा महसूल कर कृष्णा कारखान्याने शासनाकडे भरला आहे.