Gram Panchayat Election: सांगलीत पहिल्याच दिवशी ९९ अर्ज, स्थानिक आघाड्यांतील घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 01:08 PM2022-11-29T13:08:36+5:302022-11-29T13:09:48+5:30
ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार
सांगली : जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सोमवारी सुरू झाली. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सरपंच पदासाठी ५२, तर सदस्यांसाठी ४७ असे ९९ अर्ज दाखल झाले. ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेसह स्थानिक आघाड्यांतील घडामोडी वाढल्या आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार, दि. २ डिसेंबरपर्यंत मुदत असून, चार दिवसांत अर्ज दाखलसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच अर्ज देण्यासाठी इच्छुकांची गर्दी होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपून सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला.
सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. मात्र ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जिल्हा परिषदेपूर्वी जाहीर झाल्या. ओबीसी आरक्षणाशिवाय सोडत काढल्यामुळे हरिपूरसह पाच ग्रामपंचायतींना या निवडणूक प्रक्रियेतून वगळले आहे. त्यामुळे सध्या ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी दहा तालुक्यांतून ९९ अर्ज दाखल झाले. यात सरपंच पदासाठी ५२, तर सदस्यांसाठी ४७ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे.
शेवटच्या दिवशीच विक्रमी अर्ज येणार
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत आहे. शेवटच्या दोन दिवसांत विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. दि. ५ डिसेंबरला अर्जांची छाननी, तर दि. ७ डिसेंबरला उमेदवारी माघारी घेण्याची मुदत आहे. वेगवान राजकीय घडामोडी सुरू असून, बैठकांचा धडाका दिसून येत आहे.
असे झाले अर्ज दाखल
तालुका | ग्रामपंचायती | सरपंचपद | सदस्यपद |
मिरज | ३६ | १ | २ |
तासगाव | २६ | २ | ४ |
क. महांकाळ | २८ | १ | ० |
जत | ८१ | १४ | १४ |
खानापूर | ४५ | ४ | ३ |
आटपाडी | २५ | ३ | १ |
पलूस | १५ | १ | २ |
कडेगाव | ४३ | ४ | ० |
वाळवा | ८८ | १७ | १९ |
शिराळा | ६० | ५ | २ |
एकूण | ४४७ | ५२ | ४७ |