सांगली : अलौकिक कलाप्रकाराने अनेक जागतिक विक्रम नोंदविलेले सांगलीचे रंगावलीकार आदमअली मुजावर गोव्यामध्ये शंभर फूट उंच व पन्नास फूट रुंद अशी प्रभू रामाची रांगोळी रेखाटत आहेत. गुरुवारी रांगोळी रेखाटण्यास सुरुवात झाली असून, १४ जानेवारीला ती पूर्ण होणार आहे.गोव्यातील वाळपई येथील शासकीय सभागृहात रांगोळी रेखाटन सुरू आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आदमअलीला यासाठी निमंत्रित केले आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या प्रभू रामाच्या मंदिराच्या उद्घाटनानिमित्त ही रांगोळी रेखाटली जात आहे. चार्ट रांगोळी व २०० किलो विविध रंगांचा वापर करण्यात येत आहे. या चित्रासाठी विशेष रांगोळी वापरण्यात येणार असून, विविध रंगांच्या दीडशे ते दोनशे छटा वापरण्यात येतील.
धनुष्य घेऊन उभारलेल्या श्रीरामाचे हे चित्र असून, त्यांच्या चरणाजवळ अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती असेल. रांगोळी पूर्ण झाल्यानंतर विधिवत पूजा करून सर्वांसाठी खुली केली जाणार आहे. रेखाटन कामाची सुरुवात विश्वजित राणे व जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या उपस्थित करण्यात आली.
हे कलाकार सहभागीविश्वविक्रमी रंगावलीकार आदमअली मुजावर, सुरेश छत्रे, दत्ता माघाडे, सुट्टीभाई कुडचे, अभिजित सुतार, आदी कलाकार ही रांगोळी साकारत आहेत.
विश्वविक्रमासाठी प्रयत्नही रांगोळी पूर्ण झाल्यानंतर भारतीय संस्कृतीचा शिरोबिंदू म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. लिमका बुक, एशिया बुक, इंडिया बुक, ग्लोबल बुक, इंटरनॅशनल बुक, वर्ल्ड बुक, हाय रेंज बुक, मार्व्हल्स बुक, गोल्डन बुक अशा विविध संस्थांच्या लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे.
महापुरुषांच्या रांगोळ्या साकारल्याआदमअली यांनी आजवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या विश्वविक्रमी रांगोळ्या साकारल्या.
प्रभू श्रीरामाचे मंदिर साकारत असतानाच त्यांच्या भव्य रांगोळीचे स्वप्न मनात बाळगले होते. विश्वविक्रम करताना येणारा खर्च अवाढव्य असतो. आमच्यासारख्या कलाकारांना ही गोष्ट शक्य नसते. त्यामुळे स्वप्न अपुरे राहते की काय, असे वाटत असतानाच मंत्री विश्वजित राणे व जनसुराज्यचे नेते समीत कदम यांच्या माध्यमातून ही संधी मिळाली. रामचरणी माझी ही कला मी अर्पण करीत आहे. - आदम अली मुजावर, रंगावलीकार