Sangli: प्रवासी जीपच्या धडकेत दोन चिमुकल्यांसह आई ठार, हेल्मेटमुळे दुचाकीस्वाराचा जीव वाचला
By घनशाम नवाथे | Published: December 11, 2024 02:59 PM2024-12-11T14:59:00+5:302024-12-11T15:00:04+5:30
तासगाव रस्त्यावर कवलापूरजवळ भीषण अपघात
सांगली : येथील तासगाव रस्त्यावर कवलापूर येथे भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिल्यामुळे तिघेजण ठार झाले. दिपाली विश्वास म्हारगुडे (वय २८), मुलगा सार्थक (वय ७), राजकुमार (वय ५,रा. आंबा चौक, यशवंतनगर, सांगली) अशी मृतांची नावे आहेत. तर दुचाकीस्वार विश्वास दादासाहेब म्हारगुडे (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर जीप चालक नितेश नाटेकर (रा. तासगाव) हा पसार झाला.
अधिक माहिती अशी, विश्वास म्हारगुडे हा मुळचा तळेवाडी (ता. आटपाडी) येथील असून तो सांगलीत वास्तव्यास आहे. सांगली परिसरात तो हमालीचे काम करत होता. बुधवारी तळेवाडी येथे लग्नासाठी तो पत्नी दिपाली, मुले सार्थक, राजकुमार यांच्यासमवेत दुचाकी (एमएच १० एएच ८७३२) वरून निघाला होता. कवलापूर ते कुमठे फाटा दरम्यान समोरून आलेल्या काळी पिवळी प्रवासी जीपने विश्वास याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरात होती की दुचाकी मोडून पडली. दुचाकीवर समोरच्या बाजूला वडिलासमोर बसलेल्या राजकुमार याच्या गळ्याला पत्रा कापून तो जागीच ठार झाला. दुसरा मुलगा राजकुमार आणि दिपाली यांच्या डोक्यात गंभीर मार लागून ते जागीच मृत झाले. तर दुचाकीस्वार विश्वास यालाही गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर रस्त्यावरील वाहन चालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतू समोरील चित्र अंगावर काटा आणणारे होते. तिघेजण जागीच ठार झाले होते. जखमी विश्वास यांना तत्काळ सिव्हीलमध्ये दाखल केले. अपघातानंतर जीप चालक तेथे न थांबता पसार झाला. सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ धाव घेतली. अपघातस्थळी शेकडो नागरिकांची गर्दी जमली होती. दोन भावंडासह आईचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून हळहळ व्यक्त होत होती.
हेल्मेटमुळे जीव वाचला
विश्वास म्हारगुडे याने हेल्मेट घातले होते. त्यामुळे जोरदार धडकेनंतर तो वाचला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. केवळ हेल्मेटमुळेच सुदैवाने त्यांचा जीव वाचल्याचे अपघातस्थळी दिसून आले.
बेदरकारपणा कारणीभूत
कुमठेफाटा येथून सांगलीकडे भरधाव वेगाने येताना चालक बेदरकारपणे जीप चालवत होता. त्याने विरूद्ध दिशेला येऊन सरळ मार्गाने निघालेल्या दुचाकीला धडक दिली. परंतू धडकेत दोन कोवळे जीव आणि आई यांचा तडफडून मृत्यू झाला.