‘काकां’ना रोखण्यासाठी ‘आबा’ गट आक्रमक
By admin | Published: December 14, 2015 11:55 PM2015-12-14T23:55:20+5:302015-12-15T00:27:34+5:30
अजितराव घोरपडे गटाचे सुमनतार्ईंना पाठबळ : कवठेमहांकाळ तालुक्याचे राजकारण नव्या वळणावर
अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ -कवठेमहांकाळ तालुक्यात खासदार संजयकाका पाटील यांना रोखण्यासाठी आमदार सुमनताई पाटील यांना माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याकडून पाठबळ दिले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राजकारणात तरबेज व मुरब्बी असलेल्या अजितराव घोरपडे यांनी तालुक्यात नवीन राजकीय समीकरणाला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
आमदार सुमनताई पाटील व अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार संजय पाटील यांना कवठेमहांकाळ तालुक्यात शह देण्यासाठी व त्यांच्याकडे जाणारा कार्यकर्त्यांचा लोंढा रोखण्यासाठी राजकीय सहकार्याचे धोरण स्वीकारले आहे.
माजी उपमुख्य मंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मतदारसंघात खंबीर, जाणकार नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कोण भरून काढणार, अशी चर्चा होत असतानाच, तासगाव तालुक्यातील आबा गट व खासदार संजयकाका पाटील गट यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला. तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आबा गट व काका गट एकमेकांना भिडल्याने वैचारिक राजकारणाला मूठमाती मिळून राजकारण मुद्द्यावरून गुद्द्यावर आले. इकडे कवठेमहांकाळ तालुक्यातही सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून वेगळ्या राजकीय समीकरणास सुरुवात झाली आहे. सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत आबा गटाने काँग्रेस व अजितराव घोरपडे गटाला मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते, आमदार जयंत पाटील यांना व त्यांनी संजयकाका पाटील यांच्या सहकार्याने एकत्रित उभे केलेल्या पॅनेलला पराभवाचा मोठा धक्का बसला. हा पराभव जयंत पाटील यांच्या जिव्हारी लागला.
यानंतर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील जयंत पाटील यांचा राजकीय हस्तेक्षेप थांबविण्यासाठी आबा गट व घोरपडे गटाने अभद्र युती केल्याच्या राजकीय चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगल्या अणि इथूनच तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली.
कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर आहेत. रोज कुणीतरी भाजपच्या वळचणीला जात असल्याचे चित्र निर्माण होऊ लागले. कार्यकर्ते खंबीर नेतृत्वाच्या शोधात असताना खासदार संजय पाटील यांनी कवठेमहांकाळ तालुक्यात आपले राजकीय बाहू बळकट करण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीला एकामागोमाग एक धक्के बसू लागले. त्यामुळे राष्ट्रवादीची नेतेमंडळी चिंताग्रस्त बनली.
तालुक्याच्या राजकारणात पहिल्याच एन्ट्रीत खासदार पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील माजी उपसभापती अनिल शिंदे, माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर, पंचायत समितीच्या विद्यमान सभापती वैशाली पाटील, पंचायत समिती सदस्य शिवाजी चंदनशिवे तसेच राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष हायूम सावनूरकर यांना आपल्या गटात खेचण्यात यश मिळवले.
या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आजवरचा राजकीय संघर्ष बाजूला ठेवून एकत्र आलेल्या घोरपडे यांच्याशी जुळवून घेत आबा गटाने पुन्हा नवी मांडणी सुरू केली आहे. यामुळे तालुक्यात नवी राजकीय समीकरणे दिसणार असून भविष्यात कोणत्याही स्थितीत काका गट वरचढ ठरू द्यायचा नाही, असा चंग आबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बांधला आहे.
दौरा सुमनतार्इंचा : कार्यकर्ते घोरपडेंचे
तासगाव तालुक्यातील राजकारणाचा विचार करता तेथे आबा गट व काका गट यांचा टोकाचा राजकीय संघर्ष आहे. तसेच दोन्ही गट तुल्यबळ आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत संजयकाका पाटील गटाला धक्का दिला. यातच संजयकाका पाटील यांनी कवठेमहांकाळ तालुक्यात राजकीय झेप घेण्यास सुरुवात केल्याने आबा गटाला व घोरपडे गटाला काका गटाचे वाढते राजकीय प्राबल्य न परवडणारे आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय धोका ओळखून राजकारणात मुरब्बी असलेल्या अजितराव घोरपडे यांनी सुमनताई पाटील यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना राजकारणातील युध्दात सहकार्याचे धोरण स्वीकारले. नुकत्याच झालेल्या आमदार सुमनताई पाटील यांच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दौऱ्यात अजितराव घोरपडे यांचे कार्यकर्ते दिसून आले.
आबा-घोरपडे गटाचे राजकीय साटेलोटे
खासदार संजय पाटील यांच्या गटाचे वाढते प्राबल्य भविष्यात तालुक्यातील आबा व घोरपडे दोन्ही गटांना परवडणारे नाही. यामुळेच आबा गट व घोरपडे गटाने तालुक्यात राजकीय साटेलोटे केल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे व तशी चर्चाही जोरात सुरू आहे.
काकांच्या थेट ‘एन्ट्री’ने डोकेदुखी
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर संजय पाटील यांच्याकडून कवठेमहांकाळ तालुक्यात बेरजेचे राजकारण
लोकसभा निवडणुकीनंतर संजय पाटील व अजितराव घोरपडे यांच्यात दुरावा, विधानसभा निवडणुकीत संजयकाकांचे पुरेसे बळ न मिळाल्याने घोरपडे नाराज
आगामी काळात संजय पाटील गटाचे कवठेमहांकाळ तालुक्यातील वाढते प्रस्थ आबा, घोरपडे दोन्ही गटांसमोर डोकेदुखी ठरण्याची शक्यता
अनेक निष्ठावंत अडचणीच्या वेळी बाहेर पडल्याने आबा गटासमोर आव्हान, त्यातूनच घोरपडेंशी जुळवून घेण्याचे धोरण.