राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी कवठेमहांकाळ शहरात तहसीलदार गोरे यांनी पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांना सोबत घेत. विनामास्क फिरणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे यांच्यावर कारवाईची धडक मोहीम राबविली. कवठेमहांकाळ शहरातील मुख्य बाजारपेठेत तहसीलदार गोरे, पोलीस निरीक्षक कोळी, मुख्याधिकारी डॉ. मोरे, रवींद्र कणसे यांच्यासह महसूल कर्मचारी, पोलीस, नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी कारवाईची मोहीम राबविली.
यावेळी तहसीलदार गोरे यांनी बाजारपेठेत व्यापाऱ्यांना, दुकानदारांना आवाहन केले. दुकानात सॅनिटायझर, ठेवण्यात यावे. ग्राहकांना सोशल डिस्टन्स ठेवूनच सेवा द्यावी, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही गोरे यांनी दिला.
कोरोनाचा संसर्ग हा परत वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या जिवाची काळजी घ्यावी. आम्ही नागरिकांच्या हितासाठीच हे सर्व खटाटोप करीत आहोत. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही गोरे यांनी केले आहे.