कोकरुड : नेमणूक केलेल्या ठिकाणी (सजा) न जाता समांतर कार्यालये थाटून कामे करणाऱ्या तलाठी, मंडल अधिकारी (सर्कल) यांच्या कार्यालयास कुलपे ठोकून शिराळा तहसीलदारांनी कारवाई केली. नेमणुकीच्या गावात जाऊन कामे न केल्यास यापेक्षा मोठी कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर खरच कारवाई होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
शिराळा तालुक्यात सहा मंडल अधिकारी आणि ३३ तलाठी कार्यालये आहेत. नेमणुकीच्या गावात तलाठी, मंडल अधिकारी येत नसल्याच्या अनेक तक्रारी तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत नागरिकांनी केल्या आहेत. शासकीय कामांची सबब सांगत तलाठी जाण्याचे टाळत होते. तालुक्यातील मणदूर, काळूद्रे, वाकुर्डे बुद्रुक, वाकुर्डे खुर्द, शिरसी, निगडी, कापरी, रेड, तडवळे, चिखली येथील तलाठ्यांची आणि कोकरुड, चरण, मांगले, शिरशी या मंडल अधिकाऱ्यांची त्याच गावात कार्यालये असताना या सर्व तलाठी व मंडल अधिकारी यांनी शिराळा येथील जुन्या कार्यालयात समांतर कार्यालये थाटून गेल्या तीन वर्षांपासून तेथून गावातील कामे सुरू केली आहेत. नवीन प्रशासकीय कार्यालयातील तहसीलदारांच्या कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आरळा, चरण, बिळाशी, रिळे, टाकवे गावच्या तलाठ्यांची कार्यालये सुरू केली आहेत.
गावात अधिकारी भेटत नसल्याने नागरिकांना थेट शिराळा येथे जावे लागते. याबाबत नागरिकांत नाराजी होती. याची दखल घेत तहसीलदार गणेश शिंदे यांनी जुन्या आणि नवीन तहसील कार्यालयातील समांतर कार्यालयांना कुलपे ठोकून कार्यालये बंद केली. तहसीलदारांच्या या धडक मोहिमेमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.