इस्लामपूर : इस्लामपूर-ताकारी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत एसटी मालवाहतुकीचा ट्रक बेदरकारपणे चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे वर्तन करणाऱ्या एसटी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत त्याने मद्य प्राशन केल्याचे स्पष्ट झाले.
सूर्यकांत तुकाराम सोलनकर असे या एसटी चालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कलम २७९ व मोटार वाहन कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी अरुण संपतराव पाटील यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांची गस्त सुरू असताना येथील दूरसंचार कार्यालयासमोरील रस्त्यावरून सोलनकर मालवाहतूक करणारा एसटीचा ट्रक (एमएच १४ बीटी ०४१४) वेड्यावाकड्या पद्धतीने चालवीत होता. त्याला थांबविण्याचा इशारा केला असता तो तसाच पुढे निघून गेला. पोलिसांनी पाठलाग करून हा ट्रक थांबविला. त्यावेळी चालक सोलनकर दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले.