अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यात ९०१ शेतकऱ्यांनी जादा क्षेत्र दाखवून अथवा फळपीक नसताना कागदोपत्री विमा उतरविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विमा कंपनीकडून तक्रार आल्यानंतर कृषी विभागाने पीकविमा उतरविलेल्या क्षेत्राच्या प्रत्यक्षात केलेल्या तपासणीत ही बनवाबनवी उघड झाली आहे. या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरु झाली आहे.पुनर्रचित हवामान आधारित ‘ फळपीक विमा योजना’ मृग बहार २०२४-२५ मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या ९ फळपिकांसाठी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आला. जिल्ह्यात मृग बहरांतर्गत विमा योजनेत २ हजार ७४७ शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन १ हजार ६४६.३६ हेक्टर क्षेत्रावर फळपीक विमा उतरविला होता. यामध्ये ९०१ शेतकऱ्यांच्या ५९२.२ हेक्टर क्षेत्रावरील तफावत आढळली आहे.
यामध्ये ३०३ शेतकऱ्यांनी ३३६.५८ हेक्टर क्षेत्रात फळपीक नसताना लागण असल्याचा बोगस फळपीक विमा उतरला होता. तसेच ५२३ शेतकऱ्यांनी फळपीक असणाऱ्या क्षेत्रापेक्षा जादा दाखविले आहे. यामध्ये १७४.११ हेक्टर क्षेत्र जास्त दाखविल्याची चौकशीमध्ये माहिती उघडकीस आली आहे. तसेच ७५ शेतकऱ्यांचे वय बसत नसताना ५१.५१ हेक्टर क्षेत्रातील फळपीक विमा उतरला होता. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांनी फळपीक विमाच उतरला नव्हता. या बोगस शेतकऱ्यांचा शासनाने विमा कंपनीकडे भरलेली विम्याची रक्कम परत मिळणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाकडून हालचाली सुरु आहेत. तसेच फळपीक विम्यामध्ये बाेगसगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
‘प्रलोभनाला बळी पडू नये’जादा विमा मिळवून देतो, असे सांगून शेतकऱ्यांना चुकीची माहिती देण्यास भाग पाडले जात आहे. मात्र, यात शासनाची फसवणूक होत असल्यामुळे फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडू नये. योग्य व कायदेशीर माहिती देत विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.
बोगस फळपीक विमा लाभार्थ्यांची संख्यातालुका - शेतकरी - क्षेत्र हेक्टरमध्ये
- आटपाडी - १६६ - ९७.११
- जत - ६८७ - ४७८.१८
- क.महांकाळ - ४४ - १४.२९
- खानापूर - ३ - १.४३
- मिरज - १ - १.१९
- एकूण - ९०१ - ५९२.२