कोविड कुटुंबांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी प्रशासनाची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:25 AM2021-05-15T04:25:35+5:302021-05-15T04:25:35+5:30
इस्लामपूर : कोरोनाच्या आपत्तीमुळे सुरू झालेला शारीरिक व्याधी कुटुंबातील, नात्यातील व्यक्तींचे आकस्मित मृत्यू, आर्थिक व्यावसायिक ताण यामुळे चिंता आणि ...
इस्लामपूर : कोरोनाच्या आपत्तीमुळे सुरू झालेला शारीरिक व्याधी कुटुंबातील, नात्यातील व्यक्तींचे आकस्मित मृत्यू, आर्थिक व्यावसायिक ताण यामुळे चिंता आणि नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी ‘चला मनोमित्र होऊ या’ हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती शुश्रुषा सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे मानसतज्ज्ञ कालिदास पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, मनाला सावरण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा राज्यातील पहिलाच उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात कोल्हापूरच्या सायबरमधील समाजविज्ञान विभागातील ८५ विद्यार्थी व प्राध्यापक मनोमित्र म्हणून सहभाग घेत आहेत. राज्यातील १२० मानसतज्ज्ञांनी जिल्ह्यातील कोविड कुटुंबांच्या मानसिक स्वास्थ्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
ते म्हणाले, कोविडमुळे चिंता, काळजी आणि नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. नातेसंबंध बिघडले आहेत. आत्महत्येच्या विचारांना थोपविण्यासाठी मानसशास्त्रीय पद्धतीने या उपक्रमातून समुपदेशन केले जाणार आहे. सध्या दररोज ५०० कुटुंबांना मानसिक आधार देण्याचे काम सुरू आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ. भारत देसाई, प्राचार्य डॉ. आर. के. आडसुळ, प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, डॉ. संज्योत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित मानसतज्ज्ञ ही सेवा देत आहेत.