लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : घरातील प्रशासकीय सेवेचा वारसा अधिक समृद्ध करीत सीताराम कुंटे यांनी प्रदीर्घ सेवेतून राज्याच्या मुख्य सचिवपदापर्यंतची वाटचाल केली. सांगलीच्या कुंटेवाड्याने राज्याच्या प्रशासकीय सेवेचे प्रमुखपद दिल्याने हे शहर राज्याच्या व देशाच्या पटलावर चर्चेत आले आहे.
सीताराम कुंटे यांच्या आजोबांचा कुंटेवाडा सांगलीतील कापडपेठेत होता. सध्या तिथे एका पतसंस्थेची इमारत आहे. कुंटे यांच्या वडिलांनी निवृत्तीनंतर घेतलेले घर विश्रामबागमध्ये आहे. सीताराम कुंटे यांचे वडील जनार्दन कुंटे हे बिहार केडरचे आयएएस होते. त्यामुळे सीताराम कुंटे यांचे बालपण पाटणा (बिहार) शहरात गेले.
३ नोव्हेंबर १९६१ मध्ये त्यांचा जन्म झाला. उच्चशिक्षणासाठी त्यांचे कुटुंब नंतर दिल्लीत स्थायिक झाले. नामांकित अर्थतज्ज्ञ असलेले जर्नादन कुंटे हे बिहारचे प्रधान सचिव म्हणून निवृत्त झाले. पुढे निवृत्तीनंतर कुंटे यांनी अहमदाबादच्या "आयआयएम'मध्ये अतिथी व्याख्याते म्हणून काम केले. निवृत्तीनंतर काही काळ सांगलीत स्थायिक झाले.
विश्रामबागला हॉटेल पै प्रकाशजवळ त्यांचे घर आहे. सीताराम कुंटे यांच्या आई गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील. कुंटे यांचे आजोळचे नाव देवधर होते.
वडिलांच्या प्रशासकीय सेवेचा वारसा सीताराम कुंटे यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदापर्यंत मजल मारुन अधिक समृद्ध केला.
अर्थशास्त्रात पदवी व पदव्युत्तर पदवी घेऊन १९८५ मध्ये कुंटे आयएएस झाले. राज्य शासनात विविध पदांवर त्यांनी काम केले. ते गेल्या ३६ वर्षांपासून प्रशासकीय सेवेत आहेत. सुरुवातीच्या काळात सीताराम कुंटे हे १९९३ आणि १९९५ मध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच मुंबई महापालिकेत ते २००१ मध्ये उपायुक्त होते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त, आयुक्त अशी जबाबदारी त्यांनी याच महापालिकेत पार पाडली. म्हाडाचे उपाध्यक्ष, उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम केले. काही वर्षे त्यांच्याकडे पर्यावरण विभागाचाही पदभार होता. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे प्रधान सचिव म्हणून तसेच गृह विभागातही त्यांनी काम केले. आता राज्याचे मुख्य सचिव म्हणून ते काम करीत आहेत. सांगलीकर असलेल्या कुंटे यांनी यानिमित्ताने सांगलीच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.