कासेगाव येथील डॉ. अरुण शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त कासेगाव-कऱ्हाड-कासेगावचा सायकल प्रवास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील डॉ. अरुण शिंदे यांनी नव्या पिढीला व्यायाम व सायकलचे महत्त्व पटवून देण्यासाठी आपल्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त कासेगाव- कऱ्हाड- कासेगाव असा सुमारे ५० किलोमीटरचा सायकल प्रवास केला. आजच्या वाढदिवसाच्या महागड्या पार्ट्या व डिजिटल बॅनरच्या जमान्यात त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व स्वागत करण्यात आले.
कोरोनाच्या संकटाला समर्थपणे तोंड द्यायचे असेल, तर प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती वाढवावीच लागेल. त्यासाठी व्यायामास पर्याय नाही. हा संदेश देण्यासाठी डॉ. शिंदे यांनी हा उपक्रम राबविला आहे. त्यांच्यासमवेत कायम सायकलचा वापर करणारे वाटेगाव येथील जयवंत पवार (वय ६५), इंजिनिअरिंगचा विद्यार्थी साहिल रज्जाक मुल्ला हे दोघे होते. त्यांनी सकाळी सहा वाजता सायकलिंग सुरू केले. ते सव्वादोन तासांत परत आले. त्यांनी दहा वर्षांपूर्वी आपल्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त कासेगाव- कऱ्हाड असा पायी प्रवास केला होता.