कस्तुरबा रुग्णालय आठ दिवसांत सुरू न केल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:27 AM2021-05-08T04:27:49+5:302021-05-08T04:27:49+5:30
तासगाव नगरपालिकेने आठ कोटी रुपये खर्चून कस्तुरबा रुग्णालयाचे नूतनीकरण केले आहे. या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले ...
तासगाव नगरपालिकेने आठ कोटी रुपये खर्चून कस्तुरबा रुग्णालयाचे नूतनीकरण केले आहे. या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक काम पूर्ण करण्यास हलगर्जीपणा केला जात आहे. रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्यास या ठिकाणी शंभर बेडचे कोरोनासाठी रुग्णालय सुरू होऊ शकते. मात्र तासगाव नगरपालिकेकडून या कामाकडे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याची टीका काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांनी केली. कस्तुरबा रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी यापूर्वी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. मंत्र्यांनी आदेश देऊनदेखील अद्याप या रुग्णालयाचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी केला.
सोमवारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील, शिवसेनेचे नेते अरुण खरमाटे, अविनाश पाटील, संजय चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे अमोल कदम यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी कस्तुरबा रुग्णालयाला भेट दिली.
या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याशी चर्चा केली. रुग्णालयाचे काम तात्काळ पूर्ण करून कोरोना रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली. आठ दिवसांत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
चौकट
रुग्णालय खासगी तत्त्वावर देण्याचा घाट
कस्तुरबा रुग्णालय मिरज वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न आहे. या ठिकाणी साठहून अधिक कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. याठिकाणी नगरपालिकेचे रुग्णालय सुरू झाल्यास शहरासह तालुक्यातील गोरगरीब रुग्णांची सोय होणार आहे. आठ कोटी रुपये खर्च खर्च करून नव्याने इमारत बांधण्यात आली आहे. मात्र ही इमारत खासगी रुग्णालयाला देण्याचा घाट घालण्यात आला आहे. असा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी यावेळी केला.