ऐतवडे बुद्रुक : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील चाँद पीर येथील ओढ्यावर बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली असून, या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले आहे. या कामाची चौकशी करावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी संतोष पाटील व माजी उपसरपंच सौरभ पाटील यांनी केली आहे.
येथील चाॅंद पीरजवळील ओढ्यावर जिल्हा परिषदेने १४ लाख ७३ हजार ८९८ रुपये खर्चून सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण केले आहे. परंतु, हे काम अत्यंत निकृष्ट झाले असून, बंधाऱ्याला गळती लागली आहे. या गळतीमुळे बंधारा फुटण्याची शक्यता आहे. हे काम सुरू असताना येथील शेतकऱ्यांनी ते निकृष्ट होत असल्याची तक्रार केली होती. मात्र, संबंधितांनी दुर्लक्ष केले. सध्या पावसामुळे बंधारा तुडुंब भरला आहे, मात्र जागोजागी गळती लागल्यामुळे पाणी वाहून जात आहे तसेच बंधारा फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कामाची चौकशी व्हावी व बंधाऱ्यांची दुरुस्ती करून मिळावी, अशी मागणी संतोष पाटील, सौरभ पाटील व शेतकऱ्यांनी केली आहे.
चौकट
चौकशीनंतरही गळती
बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, यासाठी तत्कालीन उपसरपंच सौरभ पाटील यांनी जिल्हा परिषदेला दि. २६ मार्च रोजी तक्रार अर्ज दिला होता. जलसंधारण विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. मात्र, चौकशी करूनही या बंधाऱ्याला गळती लागली आहे.