कुंडल : राष्टÑवादीकडे राज्यातील सर्वात महत्त्वाची खाती होती. तरीही राज्यातील पाणीप्रश्न अनुशेषाच्या अडचणींमुळे पूर्णपणे मार्गी लावता आले नाहीत, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (गुरुवारी) कुंडल येथील कार्यक्रमात व्यक्त केली. कुंडल येथे क्रांती कारखान्याच्या गाळपक्षमता व सहवीज निर्मिती प्रकल्पाचे विस्तारिकरण, क्रांती उपसा जलसिंंचन योजना व कुंडल जलस्वराज्य योजना या प्रकल्पांचे उद्घाटन पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील उपस्थित होते. पवार म्हणाले की, साखर कारखान्यांनी इतर पूरक प्रकल्प उभारण्याची गरज आहे. कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प उभे करावेत. यामुळे उसाला जादा दर देता येईल. सध्या साखरेचे दर वाढत नाहीत. त्यामुळे उसाला जादा दर मिळत नाही. इथेनॉल प्रकल्प उभा करण्यासाठी क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड कारखान्यास सर्व ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण होणार्या विजेचा दर ६.५ रुपयांपर्यंत वाढवला आहे. यंदा १ आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे धोरण आहे. सहकारी साखर कारखान्यांना यापुढे सरकारी मदत मिळणार नाही. याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पाण्याचे स्रोत कमी होेत आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. शेतकर्यांनी ठिबक सिंचनचा जास्तीत जास्त वापर करावा. कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादनाची गरज आहे. शेतकर्यांसमोर नवनवी संकटे येत आहेत. संकटे आली तरी शेतकर्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले, जी. डी. बापूंनी तत्त्वाचे राजकारण केले. तडजोड केली असती तर ते मुख्यमंत्री पदापर्यंत गेले असते. परंतु सर्वसामान्य व गोरगरीब जनता सुखी रहावी यासाठी त्यांनी अहोरात्र कार्य केले. शेतकर्यांची प्रगती व्हावी म्हणून त्यांची धडपड होती. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले, तत्त्वांनी व विचारांनी वागले पाहिजे, ही भूमिका जी. डी. बापूंनी शिकवली. या परिसरात जिद्दीचे कार्यकर्ते असून, कार्यकर्त्यांत संघर्ष करण्याची भूमिका आहे. आ. बबनदादा शिंदे म्हणाले, अरुण लाड यांना पदवीधर मतदार संघातून उमेदवारी मिळावी, सोलापूर जिल्ह्यातून सर्व ते सहकार्य करू. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले, पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांना उमेदवारी द्यावी, सर्व ताकदीनिशी निवडून आणू. या मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड म्हणाले, अनेक अडचणीतून कारखाना उभा राहिला. जी. डी. बापूंना अपेक्षित असणारे कार्य करण्याची गरज आहे. बेरोजगारी वाढली आहे. सर्वसामान्य व कष्टकर्यांच्या मुलांना तांत्रिक व उच्च शिक्षण मिळत नाही. बापूंचे कार्य पुढे नेण्यासाठी सहकार्य करा. चांगली पदवीधर मतदार नोंदणी केली आहे. पक्षाचे काम वाढवले आहे. पक्षाने कामाची संधी द्यावी. यावेळी आ. मानसिंगराव नाईक, आ. रमेश शेंडगे, खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, विलासराव शिंदे, अनिल बाबर, उषाताई दशवंत, विनायक पाटील, संग्राम देशमुख, माणिकराव पाटील, अमरसिंह देशमुख किरण लाड, शरद लाड, उद्योगपती उदय लाड आदी उपस्थित होते. माजी जि. प. सदस्य कुंडलिक एडके यांनी आभार मानले. (वार्ताहर)
अनुशेषामुळे राज्यातील पाणी प्रकल्प रखडले अजित पवारांची खंत : कुंडलच्या क्रांती साखर कारखान्याच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन
By admin | Published: May 09, 2014 12:14 AM