सर्वच पक्षांना अखेर उमेदवार मिळाले!
By admin | Published: September 28, 2014 12:44 AM2014-09-28T00:44:01+5:302014-09-28T00:44:16+5:30
प्रकाश शेंडगे राष्ट्रवादीतून : भाजपचे तेली, ‘स्वाभिमानी’चे खराडे यांना शिवसेनेचे तिकीट
सांगली : पक्षबदलाचे उधाणलेले तुफान... उमेदवारीतील गोंधळ... गुंता सोडविण्यासाठी नेत्यांचे रात्रभर जागरण अशा वातावरणात विचित्र घडामोडींनी अखेर आज, शनिवारी सर्वच पक्षांना उमेदवार मिळाले! भाजपने पत्ता कट केलेले आमदार प्रकाश शेंडगे यांना राष्ट्रवादीने जतमधून उमेदवारी दिली.
मिरजेतून सी. आर. सांगलीकरांची उमेदवारी रात्री साडेबाराला बदलून पुन्हा सिद्धार्थ जाधव यांना देण्यात आल्याचे स्पष्ट झाले, तर मिरजेतूनच राष्ट्रवादीने कॉँग्रेसमधील नाराज बाळासाहेब होनमोरे यांना तिकीट दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून तासगाव-कवठेमहांकाळची उमेदवारी मिळविली.
जिल्ह्यातील आठ मतदारसंघां-साठी आज, शनिवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी घाईगडबडीत सर्वच पक्षांचे उमेदवार निश्चित झाले. पक्षाचा एबी फॉर्म देऊन अधिकृत याद्याही जाहीर करण्यात आल्या. यासाठी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी रात्र जागवली. या आठही मतदारसंघांतील लढतीचे चित्र अस्पष्ट होते. त्यातच आघाडी आणि महायुती तुटल्यानंतर उमेदवार शोधण्याची वेळ सर्वच पक्षांवर आली. काल, शुक्रवारी या घडामोडींना वेग आला होता. आजही तीच स्थिती राहिली. एकमेकांचे उमेदवार पळविण्यापासून मतविभागणीचे गणित मांडत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि मनसेने अधिकृत उमेदवारांची यादी शनिवारी दुपारी प्रसिद्ध केली.
जतचे भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांचे तिकीट कापले गेल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली. मिरजेतील राष्ट्रवादीच्या जागेबाबत पहाटेपर्यंत खलबते सुरू होती. काँग्रेसमध्ये तर वाद निर्माण झाला. जाधव यांचे नाव दोन दिवसांपूर्वी निश्चित झाल्याचे समजल्यानंतर काहींनी सी. आर. सांगलीकर यांच्यासाठी ताकद लावली होती. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा सांगलीकर यांना तिकीट देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या समर्थकांनी फटाकेही उडवले. मात्र, रात्री साडेबाराच्या सुमारास काँग्रेसची यादी जाहीर झाली. त्यातून सिद्धार्थ जाधव यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी उमेदवारी नाकारली गेल्याचे कळाल्यानंतर जाधव यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय गाठले होते. त्यांच्या नावावर विचार सुरू होता. मात्र, रात्री राष्ट्रवादीने सकाळी कॉँग्रेसमधील नाराज बाळासाहेब होनमोरे यांना तिकीट जाहीर केले.
राष्ट्रवादीच्या सांगलीतील जागेवर माजी आमदार दिनकर पाटील, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी महापौर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान प्रयत्नशील होते. रात्रभराच्या चर्चेनंतर सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे दिनकर पाटील समर्थक नाराज झाले. पलूस-कडेगावमधून राष्ट्रवादीने कुंडलच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा लाड यांना उमेदवारी दिली.
शिवसेनेच्या गळाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपचे मासे लागले. शिवसेनेने तासगाव-कवठेमहांकाळमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांना, तर जतमधून भाजपचे संगमेश तेली यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले जि. प. चे सदस्य भीमराव माने यांना इस्लामपुरातून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात मैदानात उतरवण्यात आले.