सांगलीच्या पालकमंत्र्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून घरचा अहेर

By अविनाश कोळी | Published: July 3, 2023 07:06 PM2023-07-03T19:06:53+5:302023-07-03T19:21:40+5:30

बांधकाम कामगारांसाठीच्या मध्यान्ह भोजन योजनेतील ५० कोटी रुपयांचा घोटाळ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

Allegation by BJP office-bearers on guardian minister of Sangli | सांगलीच्या पालकमंत्र्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून घरचा अहेर

सांगलीच्या पालकमंत्र्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून घरचा अहेर

googlenewsNext

सांगली : शासनाच्या बांधकाम कामगारांसाठीच्या मध्यान्ह भोजन योजनेत जिल्ह्यात सुमारे ५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. याबाबत कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप भाजप अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. घोटाळ्याचे पुरावे सादर करीत त्यांनी खाडे यांना घरचा अहेर दिला आहे.

भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश चिटणीस व कामगार आघाडीचे अमित कदम, आश्रफ वांकर यांच्यासह चार पदाधिकारी याप्रश्नी मंगळवारी ४ जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. पत्रकार परिषदेत कदम म्हणाले की, मध्यान्ह भोजन योजनेतील घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. कागदोपत्री पुरावे गोळा करून आम्ही या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहेत. 

पालकमंत्र्यांनाही हे पुरावे सादर केले, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आम्ही उपोषणास बसणार आहोत. जोपर्यंत जिल्ह्यातील सहायक कामगार आयुक्तांवर घोटाळाप्रकरणी कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार, असा इशारा त्यांनी दिला. याप्रकरणात सहभागी असलेली कंपनी, त्यांचे प्रतिनिधी तसेच कामगारांच्या बोगस नोंदी करणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असे कदम म्हणाले.

Web Title: Allegation by BJP office-bearers on guardian minister of Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.