इस्लामपूरच्या प्राणीमित्राने वाचवले जुनेखेडच्या शेतकऱ्याचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:27 AM2021-05-18T04:27:01+5:302021-05-18T04:27:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : जुनेखेड (ता. वाळवा) येथील शेतकऱ्याला शेतात सायंकाळी सातच्या सुमारास सर्पदंश झाला होता. ही घटना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जुनेखेड (ता. वाळवा) येथील शेतकऱ्याला शेतात सायंकाळी सातच्या सुमारास सर्पदंश झाला होता. ही घटना २० एप्रिल रोजी घडली होती. इस्लामपूरमधील प्राणीमित्र युनुस मणेर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्पदंश केलेल्या सापाची माहिती देत तातडीने उपचार करवून घेतल्याने या शेतकऱ्याचे प्राण वाचले.
प्रवीण विष्णू कांबळे असे या शेतकऱ्याचे नाव असून, २० एप्रिल रोजी ते सायंकाळच्या सुमारास शेतामध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांच्या पायाला काहीतरी चावल्याची जाणीव झाली. त्याचवेळी त्यांना साप दिसला. ही माहिती कांबळे यांनी पीपल फॉर ॲनिमलचे प्राणीमित्र युनुस मणेर यांना दिली. मणेर यांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालात येण्यास सांगितले. तेथे कांबळे यांना या सर्पदंशानंतर मळमळणे, चक्कर येणे, पोटात जोराच्या कळांसह अस्वस्थ वाटत होते. प्राणीमित्र मणेर यांनी या लक्षणांवरून विषारी मण्यार हा साप चावल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉ. दीपाली खरात यांना दिली. त्यांनी प्राथमिक उपचार करून कांबळे यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. देवदत्त पाटील, साजीद रोटीवाले यांनी तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. तेथील उपचारानंतर १० मे रोजी प्रवीण कांबळे बरे होऊन घरी परतले आहेत. प्राणीमित्र मणेर, डॉ. नरसिंह देशमुख आणि डॉ. खरात यांच्या प्रयत्नांमुळे जीव वाचल्याचे ते म्हणाले.
चौकट
युनुस मणेर गेल्या २५ वर्षांपासून सर्प आणि प्राणीमित्र म्हणून परिसरात काम करतात. यापूर्वी त्यांनी विषारी साप चावलेल्या रुग्णांना आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सापांबद्दलची योग्य ती माहिती देत अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.