मिरज : मिरजेतील ॲपेक्स केअर हॉस्पिटलचा संचालक डॉ. महेश जाधव याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात गांधी चौक पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. सत्रन्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताच पुण्यास पळून चाललेल्या डॉ. जाधव यास पोलिसांनी पाठलाग करून कासेगाव (ता. वाळवा) येथे अटक केली. कोविड साथीदरम्यान सदोष उपचाराच्या आरोपावरून जिल्ह्यात डाॅक्टरला प्रथमच अटक झाली आहे.
मिरजेतील ॲपेक्स कोविड रुग्णालयात पुरेशी यंत्रसामग्री नसतानाही दोन महिन्यांत २०५ रुग्ण दाखल करून घेण्यात आले होते. यापैकी ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. रुग्णालयातील उपचाराबाबत व बिल आकारणीबाबतच्या तक्रारीमुळे महापालिका प्रशासनाने येथे काेविड रुग्णांवर उपचार करण्यास बंदी घातल्यानंतरही डॉ. महेश जाधव याने नवीन रुग्ण दाखल करून घेतल्याचे महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाले. याबाबत महापालिका आरोग्य अधिकारी डाॅ. सुनील आंबोळे यांनी डॉ. जाधव याच्याविरुद्ध गांधी चाैक पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी चाैकशी करून, त्याला मदत करणाऱ्या इतर सात जणांवरही गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली, तर दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. ॲपेक्स केअर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २०५ रुग्णांपैकी तब्बल ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने, हलगर्जीपणा व मृत्यूस कारणीभूत असल्याबद्दल डॉ. जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
सत्रन्यायालयाने शुक्रवारी डॉ. जाधवचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर न्यायालय परिसरातून डाॅ. जाधव पसार झाला. ताे पुण्याकडे निघाला असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण व कासेगाव पाेलिसांच्या पथकाने पाठलाग करून त्यास कासेगाव येथे अटक केली. त्यास महात्मा गांधी चौक पोलिसांकडे सोपविले. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.
चाैकट
डेथ ऑडिट अहवालाची प्रतीक्षा
ॲपेक्स कोविड रुग्णालयातील ८७ रुग्णांच्या ‘डेथ ऑडिट’ची पोलिसांना प्रतीक्षा आहे. व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसतानाही कोविड रुग्णालय सुरू केले होते. तज्ज्ञ वैद्यकीय पथकाऐवजी होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रुग्णांवर उपचार करण्यात आले. भरमसाट बिलांची आकारणी करून पावत्या देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या चाैकशीत निष्पन्न झाले आहे.