सांगली : मिरजेच्या ॲपेक्स रुग्णालयातील ८७ रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, हे प्रकरण दाबण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. लवकरच या प्रश्नी भाजप सीबीआयकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
शेलार म्हणाले की, सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या आयुक्तांची याप्रकरणी भूमिका संशयास्पद आहे. या रुग्णालयाच्या परवानगीपासून अनेक गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत, अशी माहिती मला भाजप कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे. दुसरीकडे हे प्रकरण दाबण्याच्या दृष्टीने पत्रकारांना नोटीस बजावण्यात आल्या. त्याचा भाजपकडून आम्ही निषेध करत आहोत. ही मुस्कटदाबी आम्ही सहन करणार नाही.
भाजपने हे प्रकरण बाहेर काढले असून, ते तडीस नेऊ. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार होताे, मात्र विधानसभा चालू दिली नाही. आता हे प्रकरण आम्ही सीबीआयकडे नेणार आहोत. प्रसंगी न्यायालयातही दाद मागू. यात जे कोणी दोषी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही.
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. राज्य सरकारने व त्यांच्या जिल्ह्यातील मंत्र्यांनी यात लक्ष घालायला हवे. केवळ गैरनियोजनामुळे रुग्ण, मृत्यूसंख्या वाढत आहे. लोकांच्या जिवाचा हा प्रश्न असल्याने सरकारने याबाबतीत गांभीर्याने पावले टाकावीत.
जिल्ह्यातील पक्षांतर्गत राजकारणाबद्दल ते म्हणाले की, पक्षाचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. मत मांडण्यामुळे पक्षात फार मोठी गटबाजी आहे, असा अर्थ घेऊ नये.
चौकट
संभाजीराजेंना आमचा पाठिंबाच
छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. ते आमचे राजे आहेत. समाजाच्या आरक्षणप्रश्नी ते जी भूमिका घेतील, त्याला आमचे सहकार्य राहील, असे शेलार यांनी सांगितले.
चौकट
आरक्षण घालविण्यामागे व्होट बँकेचा अजेंडा
मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी ठाकरे सरकारची भूमिका चुकीची आहे. भाजपला श्रेय मिळू नये व त्यांची व्होट बँक सुरक्षित राहावी, असा त्यामागे छुपा अजेंडा होता, अशी टीका शेलार यांनी यावेळी केली.