आटपाडी पोलीस ठाण्याचे रुपडे पालटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:25 AM2021-04-19T04:25:04+5:302021-04-19T04:25:04+5:30
अविनाश बाड आटपाडी : वादग्रस्त कारभारामुळे नेहमी चर्चेत असणारे आटपाडी पोलीस ठाणे आता कात टाकत आहे. विविध सुविधांच्या माध्यमातून ...
अविनाश बाड
आटपाडी : वादग्रस्त कारभारामुळे नेहमी चर्चेत असणारे आटपाडी पोलीस ठाणे आता कात टाकत आहे. विविध सुविधांच्या माध्यमातून या पोलीस ठाण्याचे रुपडे पालटत आहे. ही एक सकारात्मक बाब पुढे आली आहे.
सांगलीपासून शंभर किलोमीटर अंतरावर असल्याने वरिष्ठ अधिकारीही अपवादानेच या पोलीस ठाण्यात येत. हे पोलीस ठाणे अनेक कारणांनी बदनाम झाले आहे. गेल्या १० वर्षांत येथे येणाऱ्या पोलीस निरीक्षकांची दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच बदली होते. तरीही या पोलीस ठाण्यात सध्या आशादायी चित्र बदलत आहे.
पूर्वी तंबाखू, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्या जायच्या त्या पोलीस ठाण्याच्या आवारात आता लोकवर्गणीतून पेव्हिंग ब्लॉक बसवले आहेत. पुढे दोन विजेचे खांब बसवून त्यावर पाच मोठे दिवे लावले आहेत. त्यामुळे रात्री लखलखाट असतो. या पोलीस ठाण्यात प्रथमच नवी वातानुकूलित महागडी मोटार आली आहे. ठाणे अंमलदारांसाठी नवीन प्रशस्त खोली आहे.
चौकट
दादा, जरा बाहेर जावा...!
आटपाडी पोलीस ठाण्यात वायरलेस कक्षाजवळ महिला पोलिसांसाठी स्वच्छतागृह आहे. त्याचा दरवाजा मोडला होता. त्यामुळे महिला कर्मचारी आत जाताना तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना बाहेर जायला सांगायच्या. आता त्या दरवाज्यासह पुढे मुख्य प्रवेशद्वारावर आणि ठाणे अंमलदाराच्या नवीन कक्षासमोर लोखंडी दरवाजे बसवले आहेत.
चौकट
खोट्या गुन्ह्यांचा शिमगा कधी थांबणार?
आटपाडी पोलीस ठाण्यातील नवे बदल होत असले तरी खोटे गुन्हे दाखल होतात ते कधी थांबणार? हा खरा प्रश्न आहे. राजकीय दबावातून मारामारी, विनयभंग ते अगदी दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी आटपाडी पोलीस ठाणे पुरते बदनाम आहे. अनेक निष्पाप तरुणांना राजकीय हेतूने गंभीर गुन्ह्यात अडकवले जात आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांची प्रतिमा वारंवार मलिन होत आहे.
- कोट
आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघंची, करगणी, खरसुंडी या पोलीस चौक्यांना रंगरंगोटी करणार आहे. आटपाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे नूतनीकरण प्रस्तावित आहे.
- भानुदास निंभोरे
पोलीस निरीक्षक, आटपाडी.