फोटो ३१ लठ्ठे सोसायटी
लठ्ठे शिक्षण संस्थेतर्फे अनिता पाटील यांना आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी शांतीनाथ कांते, सुहास पाटील, जयश्री पाटील आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्त्रीच्या कष्टाचे फक्त कौतुक पुरेसे नाही, त्या पलीकडे जाऊन तिचे कष्ट कमी करण्यासाठी प्रयत्न हवेत असे मत कवयित्री नीलम माणगावे यांनी व्यक्त केले. लठ्ठे शिक्षण संस्थेत आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. चिपरी (ता. शिरोळ ) येथील अनिता सुनील पाटील यांना यंदाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. राजमती नेमगाेंडा पाटील यांच्या २०व्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार देण्यात आला.
माणगावे म्हणाल्या की, प्रत्येक स्त्रीच्या कष्टाच्या कौतुकाची गरज आहेच; पण कष्ट कमी होणेही आवश्यक आहे. तिच्याकडे फक्त स्त्री म्हणून न पाहता माणूस म्हणून पाहायला शिकले पाहिजे. अनिता पाटील यांच्या कन्या किरण म्हणाल्या, की आईने अपार कष्ट करुन शिकविल्यानेच मी आयटी अभियंता होऊ शकले.
संस्थेचे अध्यक्ष शांतीनाथ कांते यांनीही मनोगत व्यक्त केेले. यावेळी मानद सचिव सुहास पाटील, चंद्रकांत पाटील, दीपक पाटील, जयश्री पाटील, प्रभारी प्राचार्या मानसी गानू, उपप्राचार्य व्ही. बी. चौगुले, आदी उपस्थित होते. रोहिणी चौगुले, अश्विनी पाटील व सहकाऱ्यांनी संयोजन केले.
..................................