सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकरांचा शस्त्रधारी पुतळा बसवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:45+5:302021-09-25T04:26:45+5:30
आटपाडी : आपल्या कर्तृत्ववाने दाही दिशांत साम्राज्य निर्माण करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ शस्त्रधारी पुतळा सोलापूर विद्यापीठात ...
आटपाडी : आपल्या कर्तृत्ववाने दाही दिशांत साम्राज्य निर्माण करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ शस्त्रधारी पुतळा सोलापूर विद्यापीठात बसवावा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माउली हळवणकर, सुभाष मस्के उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, आपल्या कर्तृत्वाने हिंदू संस्कृतीचा स्वाभिमान स्थापित करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे शील आणि शौर्य यांचा मिलाप आहे. एका हातात शास्त्र आणि एका हातात शस्त्र घेऊन अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी राज्य उभे केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात त्यांचा पुतळा बसविण्यात यावा, असा ठराव पहिल्या स्मारक समितीने मंजूर केला होता.
परंतु पहिल्या समितीच्या ठरावाला बाजूला सारत व लोकभावनेचा आदर करत नव्याने स्थापन झालेल्या स्मारक समितीने अश्वारूढ पुतळा बसवण्याचे नाकारले आहे.
अहिल्यादेवींच्या शिवपिंडधारी प्रतिमा व पुतळे भारतात अनेक ठिकाणी आहेत. विद्यापीठात मात्र त्यांच्या पराक्रमी बाण्याचे दर्शन घडवणारा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा बसवला पाहिजे, अशी आग्रही जनभावना आहे.
या विद्यापीठात उच्चशिक्षण घेण्यासाठी युवक-युवती येत असतात. त्यांना प्रेरणा देण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा करू शकतो.
अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारा पुतळा उभारला गेला पाहिजे. याविषयी कुणाचंच दुमत नाही. परंतु या स्मारक समितीमध्ये राजकीय हेतूने आलेल्या काही व्यक्तीच्या हट्टामुळे अश्वारूढ पुतळ्याच्या मागणीच्या लोकभावनेला टाळलं जात आहे. तरी आपण विद्यापीठाचे कुलपती म्हणून आदेश द्यावेत, अशी मागणी पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. यावेळी कोश्यारी यांनी लोकभावनेचा विचार करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.