विद्यार्थी, संस्था, शिक्षकांच्या विकासासाठी नॅकची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:27+5:302021-07-17T04:22:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : नॅक ही व्यवस्था संस्था, महाविद्यालय, प्राध्यापक किंवा विद्यापीठ यांच्यासाठी नसून विद्यार्थी हा घटक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : नॅक ही व्यवस्था संस्था, महाविद्यालय, प्राध्यापक किंवा विद्यापीठ यांच्यासाठी नसून विद्यार्थी हा घटक केंद्रबिंदू मानून संस्था व शिक्षकांचा गुणवत्तापूर्ण विकास व्हावा, यासाठी आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अशोकभोईटे यांनी व्यक्त केले.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या आयक्यूएसीच्या वतीने हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘नॅकला सामोरे जाताना’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. प्राचार्य डॉ. अरुण पाटील अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भोईटे म्हणाले, उच्च शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या नॅक परीक्षणाचा गाभा घटकसंस्था आणि शिक्षकांनी समजून घ्यायला हवा. अभ्यासक्रम तयार करताना स्थानिक गरजांबरोबर वैश्विक मूल्ये रुजतील, अशी रचना असावी.
प्राचार्य पाटील म्हणाले, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, सरचिटणीस सरोज पाटील आणि संस्था व्यवस्थापनाच्या बहुजन केंद्रित तत्त्वानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारे नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचे नियोजन केले आहे.
प्रा. डॉ. बळीराम सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. प्रमोद गंगनमाले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पी. व्ही. गायकवाड यांनी आभार मानले.