लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : येथील हुतात्मा संकुलातर्फे देण्यात येणारा ‘अरुणभय्या नायकवडी स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार’ यंदा सांगलीच्या संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या (संग्राम) सचिव मीना सरस्वती शेषू यांना जाहीर झाला. संकुलाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
स्मृतिचिन्ह, मानपत्र व पंचवीस हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अरुणभय्या नायकवडी यांच्या स्मृतिदिनी म्हणजे बुधवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी वाळव्यात पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.
नायकवडी म्हणाले की, सांगलीच्या ‘संग्राम’च्या सचिव मीना शेषू यांनी एडस् निर्मूलनासाठी जनजागृती केली आहे. १९८८ मधील दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य संमेलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या सर्व सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग राहिला आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता क्षेत्रासह कामगार-सामाजिक चळवळीतील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
या पुरस्काराचे यंदा सोळावे वर्ष असून, आतापर्यंत हा पुरस्कार हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना, हुतात्मा सहकारी बँक, ऊस उत्पादक विठ्ठल मोहिते (शिरगाव-वाळवा), ज्येष्ठ विचारवंत प्रा. डाॅ. बाबूराव गुरव, निपाणीचे प्रा. अच्युत माने, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. रा. कृ. कणबरकर, डाॅ. नरेंद्र दाभोळकर, पत्रकार अशोक घोरपडे, काॅ. किशोर ढमाले, काॅ. नरसय्या आडम, हिवरेबाजारचे आदर्श सरपंच पोपट पवार, ‘गोकूळ’चे अरुण नरके, पद्मश्री डाॅ. रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे यांना प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारातून कला, सहकार, आर्थिक, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता, शैक्षणिक, कृषी व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रेरणा आणि उमेद मिळावी व नवीन पिढीत असेच कार्यकर्ते घडावेत, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे, असे नायकवडी म्हणाले.
चौकट
श्वेता मयेकर यांचाही गौरव होणार
अरुणभय्या नायकवडी यांचे शिक्षण दापोलीतील डाॅ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात झाले. तेथे पदव्युत्तर वर्गामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास अरुणभय्या नायकवडी यांच्याच नावे दुसरा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा तो पुरस्कार श्वेता मयेकर यांना देण्यात येणार आहे.