घनश्याम नवाथेसांगली : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर ऑक्टोबर महिन्यात अपघातांची मालिकाच पहायला मिळाली. नोव्हेंबर महिन्यात तब्बल ४१ जणांचा अपघातीमृत्यू झाल्याची नोंद वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात झाली. तर ८० हून अधिक जखमी झाले.जिल्ह्यात गेली अनेक वर्षे अपघात होणारी ठिकाणे म्हणजेच ‘ब्लॅक स्पॉट’ कायम होती. वर्षानुवर्षे अरुंद मार्ग, धोकादायक वळण, चढ-उतार असा मजकूर लिहिलेले फलक आढळत होते. परंतु ‘ब्लॅक स्पॉट’ हटवण्याबाबत उपाययोजना गेल्या काही वर्षात करण्यात आल्या. त्यामुळे जवळपास ६० ते ६५ अपघाताची ठिकाणी हटवण्यात आली. त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या. आता फक्त बोटांवर मोजण्याइतपतच अपघाताची ठिकाणी शिल्लक आहेत. ती देखील हटवली जाणार आहेत.
पूर्वी धोकादायक रस्ता, वळण, चढ-उतार, अरुंद पूल आदी कारणांमुळे अपघात होत होते. परंतु ही अपघाताची ठिकाणे नामशेष केल्यानंतरही अपघातांची मालिका सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्गावर देखील अपघात होऊ लागले आहेत. अलिकडच्या काळात वाहनधारकांच्या बेदरकारपणामुळे अपघात वाढत आहेत. दारूच्या नशेत वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, वेगावर नियंत्रण नसणे, झोप आली असताना वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे यामुळे अपघात होत आहेत.अपघाताच्या प्रमुख कारणांचा अभ्यास केल्यानंतर अलिकडच्या काळात बहुतांश अपघात वाहन चालकाच्या बेदरकारपणामुळे होतात, असे दिसून येते. खराब रस्ता, खड्डे, गतिरोधक आदी कारणांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या कमी आहे. वाढते अपघात ही एक शोकांतिकाच म्हणावी लागत आहे. एखाद्या युद्धातही बळी जात नाहीत इतके लोक अपघातात ठार होतात.
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा महामार्ग आदी ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात झाल्याचे चित्र दिसून आले. नोव्हेंबर महिन्यात तब्बल ४१ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर ८० हून अधिक जणांना अपंगत्व आले. हे वाढते अपघाताचे प्रमाण चिंताजनक म्हणावे लागते.
कुटुंबावर आघातदररोज घडणाऱ्या अपघातामध्ये कोणाच्या घरातील कर्ता पुरुष, कोणाचा वारसदार, कोणाची पत्नी, आई, वडील, मुलगी, मुलगा गमावण्याची वेळ येते. अपघातानंतर भलेही पोलिसात गुन्हा दाखल होऊन पुढे न्यायालयात भरपाई मिळत असेल. परंतु, अपघातात प्रिय व्यक्ती गमावल्यानंतर कुटुंबाचे होणारे नुकसान कधीही न भरून येणारे असते.
अपंगत्व आल्यास फरपटअपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास संबंधित व्यक्तीला त्याच्या जवळच्या नातेवाइकांना आयुष्यभर साथ द्यावी लागते. अपंगत्वामुळे दैनंदिन जीवन जगताना संबंधित व्यक्तीची फरपट होत राहते.
नियमांचे पालन हवेवाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास संभाव्य अपघात निश्चित टाळू शकता येतात. रस्त्यावरील दोषामुळे होणारे अपघात कमी होत असताना, मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे.