आष्टा पोलीस अॅक्शन मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:27 AM2021-05-08T04:27:45+5:302021-05-08T04:27:45+5:30
आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद, दीपक सदामते ,संजय सनदी यांच्यासह पोलीस आष्टा- शिगाव रोडवरील चेकपोस्ट येथे विनाकारण ...
आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद, दीपक सदामते ,संजय सनदी यांच्यासह पोलीस आष्टा- शिगाव रोडवरील चेकपोस्ट येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा पोलिसांकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी स्वत: रस्त्यावर उतरून कारवाई करण्यास सुरुवात केल्याने विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आष्टा शहर व परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. औषध दुकाने व दूध डेअरी वगळता सर्व दुकाने बंद असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे.
शहर व परिसरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करीत २१ दुचाकी व २ कार जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच विनामास्क फिरणाऱ्या २५ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. संचारबंदीच्या उल्लंघनाबाबत १५ लोकांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक अजित सिद, सहायक पोलीस निरीक्षक उदय देसाई, मनोज सुतार, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक सदामते, संजय सनदी, एस. जे. देशिंगे यांच्यासह सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व २३ गावे व आष्टा नगरपरिषद हद्दीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीची कडक अंमलबजावणी करीत आहेत.
लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी केले आहे.