भिडस्थ वाटेवरच्या अश्विनी भिडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:24 AM2021-03-21T04:24:08+5:302021-03-21T04:24:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : प्रशासकीय सेवेत आपल्या भिडस्थ स्वभावामुळे प्रसंगी सरकारशी पंगा घेणाऱ्या काही मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये अश्विनी भिडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्रशासकीय सेवेत आपल्या भिडस्थ स्वभावामुळे प्रसंगी सरकारशी पंगा घेणाऱ्या काही मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये अश्विनी भिडे यांच्या नावाचा समावेश होतो. मूळच्या सांगलीकर असलेल्या अश्विनी भिडे यांनी प्रशासकीय सेवेच्या येथील परंपरेला आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करून दिली.
अश्विनी सतीश भिडे यांचा जन्म २५ मे १९७० रोजी झाला.
मराठी माध्यमात शिकलेल्या अश्विनी सतीश भिडे या शिक्षणात हुशार असूनही ठरलेल्या अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्राच्या वाटेने न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कला शाखेला प्रवेश घेतला. दहावी, बारावीच्या परीक्षेत त्या गुणवत्ता यादीत झळकल्या होत्या.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अश्विनी भिडे यांचे वडील बँक अधिकारी होते. आयएएस अधिकारी होणे हे आधीपासूनच अश्विनी भिडे यांनी ठरवले होते. त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून बी.ए.चे शिक्षण घेतले. पुढे पुणे विद्यापीठातून त्यांनी इंग्लिश विषय घेऊन एम.ए. केले. पदवी शिक्षणाचा अभ्यास करतानाच अश्विनी यांनी यूपीएससी परीक्षेची तयारीही सुरू ठेवली होती. त्याला त्यांच्या घरच्यांनीही विरोध केला नाही. त्यांनी या काळात घेतलेल्या कष्टाला फळ मिळाले व १९९५ मध्ये यूपीएससी परीक्षेत सर्व मुलींमध्ये देशात प्रथम येण्याचा मान त्यांना मिळाला.
उपजिल्हाधिकारी म्हणून इचलकरंजी येथे त्यांना पहिले पोस्टिंग मिळाले. सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. नागपूरमध्ये कार्यरत असताना त्यांनी विकासकामांबरोबरच कमी खर्चात लघु जलसिंचन करणारे बंधारे उभारले. या बंधाऱ्यांची नोंद 'अश्विनी बंधारे' अशी झालेली आहे.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपसचिव म्हणून जबाबदारी पार पाडली. विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याचे प्रलंबित काम अश्विनी भिडे यांनी कमी कालावधीत पूर्ण केले. मंत्रालयात सचिव आणि उपसचिव पदांवर तसेच शिक्षण सचिव म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. मुंबई मेट्राेच्या संचालकपदी असताना त्यांच्या भिडस्थ स्वभावाचे दर्शन राज्याला झाले. आता त्या मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळताहेत.