आष्टा : आष्टा नगरपरिषदेने केंद्राच्या व राज्याच्या सर्वच योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. येत्या काळात आष्टा हे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर होईल. शहरातील सर्व गोरगरिबांना घरकुले देण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी रविवारी केले.आष्टा नगरपरिषदेच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्धापनदिन सांगता समारंभाच्या समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, माजी आमदार विलासराव शिंदे, नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे, लीलाताई जाधव, माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे, पं. स. उपसभापती सौ. भाग्यश्री शिंदे, वैभव शिंदे, विशाल शिंदे, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे, ‘पीपल्स’चे अध्यक्ष दिलीप वग्याणी, विराज शिंदे, मोहनराव शिंदे, संग्राम फडतरे, झुंझारराव पाटील, झिनत आत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले, गरिबांना घरे देण्यासाठी सध्या विविध ठिकाणी बहुमजली इमारतीच्या वर आणखी एक ते दोन मजले उभारण्यात येतील. आष्टा शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात येतील. ३१ डिसेंबरअखेर आष्टा १00 टक्के शौचालययुक्त शहर होणार आहे. पालिकेने सेंद्रीय खत प्रकल्प राबवित देशात आदर्शवत कामगिरी केली आहे.विलासराव शिंदे म्हणाले, आष्टा शहर हे शेतीप्रधान आहे. याठिकाणी औद्योगिक विकास झाला नाही. पालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवित शहराचा विकास केला आहे. स्वागत कमानी, प्रमुख रस्ते, चौक यांना नावे देऊन, चौक सुशोभिकरणातून शहरातील गुणवंतांच्या त्यागाचा गौरव केला आहे.नगराध्यक्षा सौ. शिंदे म्हणाल्या, पालिकेच्या विकास कामांना शासनाने सहकार्य केले आहे. मर्दवाडी येथील महादेव मंदिराचा जीर्णोध्दार व्हावा, घरकुलांच्या अपूर्ण कामास निधी मिळावा, पालिकेला पाण्याचे वीज बिल शेतीप्रमाणे कमी दरात आकारण्यात यावे.वर्धापन दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या वारसांचा, आजी व माजी कर्मचारी, उत्कृष्ट गणेश मंडळ, स्मशानभूमी सुशोभित करणाऱ्या शिवनेरी, एकवीरा संस्थांसह हुतात्मा स्मारक बगीचा विकसित करणाऱ्या इंजिनिअर असोसिएशनचा, विविध सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी प्रास्ताविक केले. विजय मोरे, प्रकाश मिरजकर, नितीन झंवर, नंदकुमार बसुगडे, तानाजी सूर्यवंशी, शैलेश सावंत, प्रकाश रुकडे, समीर गायकवाड, प्रणव चौगुले, मयूर धनवडे, बाळासाहेब वाडकर, जोतिराम भंडारे, नियाजूल नायकवडी, दादा शेळके, शेरनवाब देवळे, चंद्रकांत पाटील, उदय कुशिरे, प्रभाकर जाधव, सतीश माळी, अभिजित वग्याणी, के. टी. वग्याणी, बबन थोटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)जागांची खरेदी-विक्री : महिन्यात प्रश्न सुटेलआष्टा येथील दत्त वसाहत, गांधीनगरातील गट क्र. ४, ६ व ९ येथील जागांचे खरेदी-वक्रीचे व्यवहार बंद असल्याने मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे, नगरसेवक मुकुंद इंगळे, दिगंबर पन्हाळकर यांनी वारंवार प्रयत्न केले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी महिन्याभरात येथील जागेचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.शहराचा विकास झालाआष्टा शहर हे शेतीप्रधान आहे. यामुळे याठिकाणी औद्योगिक विकास झाला नाही. पालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवित शहराचा विकास केला आहे. स्वागत कमानी, प्रमुख रस्ते आदी विकास कामाच्या माध्यमातून शहराचा विकास केला आहे, असे मत माजी आमदार विलासराव शिंदे यांनी व्यक्त केले.
आष्टा होणार पहिले झोपडपट्टीमुक्त शहर
By admin | Published: December 07, 2015 11:46 PM