शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला
सांगली : जिल्ह्यात दोन अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणी पूर्व मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. नांगरण, कुळवणीची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत. येत्या पंधरा दिवसांत मशागती पूर्ण करून शिराळा तालुक्यात मे महिन्यात धूळवाफेवर भाताच्या पेरण्या होत आहेत. तसेच १५ जूनपासून अन्य पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती.
रिक्षाचालकांचे हप्ते थांबले
सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने कडक लॉकडाऊन सुरू केले आहे. यामुळे रिक्षाचालकांचे उत्पन्न थांबल्यामुळे बँकांचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न रिक्षाचालकांसमोर उभा आहे. शासनाने बँकांचे हप्ते महिन्याचे माफ करावेत, अशी रिक्षा संघटनेची मागणी आहे. राज्य शासनाकडून दीड हजार रुपयांची मदत मिळणार असल्यामुळे महिन्याचा पोटाचा प्रश्न सुटल्याची भावना रिक्षाचालकांमधून व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून कारवाई, तरीही तरुण बेफिकीर
सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तरुणांनी रस्त्यावरून फिरू नये, यासाठी पोलिसांनी कॉलेज कॉर्नर परिसरात कडक कारवाई सुरू केली आहे. तरीही तरुण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. आमच्यासाठी नव्हे, तर तुमच्या आरोग्यासाठी तर रस्त्यावरुन फिरू नये, अशी भावना पोलीस तरुणांकडे व्यक्त करीत आहेत.